7 वर्षीय मुलीला अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीला १५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
अंगणात खेळत असलेल्या सात वर्षीय मुलीला बगिच्यात खेळण्याचे आमिष दाखवत तिला झुडपात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या २१ वर्षीय आरोपीला १५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा वर्धा न्यायालयाने सुनावली आहे.
रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोरक्षण व\र्ड येथील पीडित सात वर्षीय मुलगी २१ मे २०१७ रोजी घरासमोरील अंगणात खेळत असताना शुभम उर्फ भुऱ्या गजानन शेंद्रे वय २१ हा तिच्या घराजवळ आला आणि बगिच्यात खेळायला जाऊ असे तिला म्हणाला. त्यानंतर तो मुलीला झुडपात घेऊन जात असल्याचे एका महिलेला दिसले. तिने तिच्या पतीला व अन्य महिलांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले असता शुभम त्या मुलीवर अतिप्रसंग करत होता.
मुलीच्या आईवडिलांना माहिती दिल्यानंतर त्यांनी रामनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीवरून शुभम शेंद्रेविरुद्ध गुन्हा दाखल करत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. पैरवी अधिकारी शंकर कापसे व राजेश थुल यांनी दहा साक्षीदारांना न्यायालयात हजर करत शासकीय अभियोक्ता यांनी साक्ष नोंदवून घेतली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून जिल्हा न्यायाधीश २ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश वर्धा आर. व्ही. आदोने यांनी आरोपीला १५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा तसेच पीडितेला दहा हजार रुपये व जिल्हा विधी प्राधिकरणाने पीडितेस नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.