स्तनपान करताना बाळाचा गुदमरून मृत्यू, महिलेची मोठ्या मुलासह विहिरीत उडी
केरळमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आपल्या 28 दिवसांच्या नवजात बाळाच्या मृत्यूमुळे मानसिक धक्का बसलेल्या एका महिलेने आपल्या 7 वर्षांच्या मोठ्या मुलासह आत्महत्या केली. घराच्या अंगणात असलेल्या 40 फूट विहिरीतच या मातेने मुलासह उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. उप्पुथरा गावात गुरुवारी सकाळी ही घटना घडली. लिझा (38) असे मृत महिलेचे, तर बेन टॉम असे तिच्या मुलाचे नाव आहे. लिझा थोडूपुझा स्थित अलाकोड सहकारी बँकेत मॅनेजर होत्या.
मुलांच्या मृत्यूमुळे बसला होता धक्का
लिझा यांच्या एका मुलाचा 2 वर्षांपूर्वी आजारपणामुळे मृत्यू झाला होता. तेव्हापासून लिझा यांची मानसिक स्थिती बिघडली होती. त्यानंतर त्यांना तिसरे अपत्य झाले होते. पण अवघ्या 28 दिवसांतच मंगळवारी या नवजात बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्तनपान करताना या बाळाच्या गळ्यात दूध अडकले होते. यामुळे श्वास गुदमरून त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती महिलेच्या कुटुंबीयांनी दिली.
आत्महत्या करेल असा होता अंदाज
आपल्या 2 मुलांच्या मृत्यू झाल्यामुळे लिझा यांना मोठा मानसिक धक्का बसला होता. बाळावर अंत्यसंस्कार केल्यानंतर लिझा मृत्युला कवटाळू शकते, अशी भीती आम्हाला वाटत होती. त्यामुळे संपूर्ण कुटुंब तिच्यावर लक्ष ठेवून होते. पण गुरुवारी सकाळी कुटुंबातील सर्व सदस्य चर्चमध्ये प्रार्थनेला जाण्यासाठी तयारी करत असताना लिझाने आपल्या मोठ्या मुलाला कवेत घेऊन विहिरीत उडी मारली.
घरासमोरील विहिरीतच घेतली उडी
लिझा मुलासह विहिरीत उडी मारताना कुटुंबीयांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. तसेच अग्निशमन दलालाही कळवले. पण मदत पोहोचेपर्यंत व विहीर खूप खोल असल्यामुळे लिझा व त्यांच्या मुलाचा बुडून दुर्दैवी अंत झाला. आई व मुलावर शुक्रवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
बाळाला दूध पाजताना घ्या काळजी
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, नवजात बाळाला दूध पाजताना काळजी घेणे आवश्यक आहे. स्तनपान करताना योग्य ती काळजी न घेतल्यास बाळाचा मृत्यूही होऊ शकतो. कारण, काळजी न घेतल्यास दूध बाळाच्या अन्ननलिकेत जाण्याऐवजी श्वसनमार्गात जाते. तिथे ते फुफ्फुसात अडकते. यामुळे मुलाचा श्वास गुदमरतो. त्यामुळे महिलांनी स्तनपान करताना विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. बाळाला नेहमी योग्य पोझीशनमध्ये स्तनपान करा.