शैक्षणिक

राज्यातील ५५.३२ टक्के शिक्षकांची ऑनलाइन बदली प्रक्रिया पूर्ण

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत जवळपास ५५.३२ टक्के शिक्षकांना त्यांच्या पहिल्या पसंतीची बदली मिळाली.

यंदा पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची राज्यातील जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया ऑनलाइन प्रणालीद्वारे राबवण्यात आली. बदली प्रक्रियेत ३४ हजार ५१० शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यातील १९ हजार ९२ शिक्षकांना, म्हणजेच ५५.३२ टक्के शिक्षकांना त्यांच्या पहिल्या पसंतीनुसार बदलीचे ठिकाण मिळाले. तर ९ हजार ६९९ शिक्षकांना दुसऱ्या ते पाचव्या पसंतीचे, ४ हजार ३ शिक्षकांना सहा ते पंधराव्या पसंतीचे बदली ठिकाण मिळाले. त्याशिवाय दुर्गम क्षेत्रातील २ हजार ५१२ जागांवरही बदली प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

शिक्षक बदली समितीचे प्रमुख आणि पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, की ऑनलाइन प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने पूर्ण झाली. प्रत्येक घटकाला विश्वासात घेण्यात आले. दुर्गम क्षेत्रातील बदल्यांबाबत काही आक्षेप होते. मात्र जास्त काळ सुगम क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांची दुर्गम क्षेत्रात बदली करण्यात आली. एकूण शिक्षकांपैकी केवळ एक टक्के शिक्षकांची दुर्गम क्षेत्रात बदली झाली आहे. बदली प्रक्रियेचे संकेतस्थळ सर्वांसाठी खुले असल्याने सर्वांना त्यातील माहिती उपलब्ध झाली. त्यामुळे कोणावरही अन्याय होण्याचा प्रश्नच नाही. बदली निर्णय सॉफ्टवेअरद्वारे घेतला जात असल्याने मानवी हस्तक्षेपाला काहीच संधी नव्हती ही महत्त्वाची बाब आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel