राजकीय
विधानसभेत राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारणाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात विरोधक आक्रमक झाले आहेत. आज विधानसभेत लोकपाल विधेयक मंजूर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीयांची बैठक बोलावली आहे. तसेच, विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तर देणार आहेत.
- राहुल गांधींवर केलेल्या कारवाईविरोधात आज विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर मुक आंदोलन केले. ‘लोकशाहीची हत्या’, असे पोस्टर विरोधकांच्या हातात होते. तसेच, हाताला व तोंडाला काळ्या फितीही बांधण्यात आल्या होत्या.
- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासह मविआचे अनेक आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते.
- विधानसभेत विरोधकांनी सभात्याग केला आहे. दोन दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजप व शिवसेनेच्या आमदारांनी राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारले होते. त्याचा निषेध करत विरोधकांनी जोडे मारणाऱ्या सदस्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. मात्र, ही मागणी मान्य न झाल्याने विरोधकांनी सभात्याग केला.
- काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, गुरुवारी शिवसेना व भाजपच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारले. त्यानंतर आम्ही तातडीने विधानसभा अध्यक्षांकडे याबाबत तक्रार करत जोडे मारणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी गुरुवारी सायंकाळपर्यंत यावर निर्णय घेऊ, असे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी निर्णय घेऊ, असे सांगितले. मात्र, अद्याप या आमदारांवर कारवाई झालेली नाही. या आमदारांवर कारवाई करण्याची विधानसभा अध्यक्षांची इच्छा दिसत नाही. विधानसभा अध्यक्षांचे वर्तन हे पक्षपाती दिसत आहे. त्यामुळे आम्ही सभात्याग केला.
- ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे म्हणाले, मला आमदार होऊन काही वर्षेच झाली आहेत. तरीही सत्ताधाऱ्यांचे अशा प्रकारचे वर्तन मी कधीही पाहीले नाही. तर, विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून महाराष्ट्राला सुसंस्कृत अशी परंपरा लाभली आहे. मात्र, या परंपरेला काळीमा फासण्याचा प्रयत्न केला जात आहे. गैरवर्तन करणाऱ्या सदस्यांवर विधानसभा अध्यक्षांची कारवाई करण्याची इच्छा दिसत नाही. त्यामुळेच आम्ही सभात्याग केला.
लोकपाल विधेयकासाठी सरकारची धावाधाव
अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकपाल विधेयक समंत करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. बैठकीला दोन्ही सभागृहाचे गटनेते, विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद उपसभापती उपस्थित राहणार आहेत.