महाराष्ट्र

वादळी पाऊस पुढील पाच दिवस सुरूच राहण्याचे संकेत…

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला वादळी पाऊस पुढील पाच दिवस सुरूच राहण्याचे संकेत आहेत. आज (ता. 11) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मार्च महिन्यात राज्यातील सुमारे 28 जिल्ह्यांना अवकाळी पाऊस व गारपिटीचा फटका बसला, अशी माहिती राज्य सरकारने दिली आहे. एप्रिलमध्येही गेल्या चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. अजूनही हे संकट संपलेले नाही. हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 एप्रिलपर्यंत हे संकट कायम राहील.

आज येथे वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

  • मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.
  • मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशिव.

राज्यात पावसाला पोषक हवामान

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आग्नेय अरबी समुद्रामध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. दक्षिण राजस्थान आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर उत्तर मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते केरळपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या पूरक स्थितीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे.

तापमानात घट

हवामान विभागाने सांगितले आहे की, आज (ता. 11) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहून, मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा इशारा आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी तापमानातही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

अवकाळी पिच्छा सोडेना

4 ते 8 मार्च आणि 16 ते 19 मार्चदरम्यान राज्यात अवकाळीचे नैसर्गिक संकट ओढवले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 177 कोटींच्या मदतीचीही घोषणा केली आहे. एप्रिल सुरू झाला तरी अवकाळी संकट अजून शेतकऱ्यांचा पिच्छा सोडत नाही. रविवारी रात्री नाशिक, जळगाव व नगर जिल्ह्यातील काही भागांना गारपिटीचा तडाखा बसला. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नाशिकच्या बागलाण, सटाणा भागात कांदा, गहू, हरभरा, आंबा व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी करून तातडीने पंचनाम्याचे आदेश दिले. नगरमध्ये रविवारी 3700 हेक्टर पिकांना फटका बसला. जळगाव जिल्ह्यातही काही प्रमाणात नुकसान झाले.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel