पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा केला खून, पोलीस कोठडीत रवानगी
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी परिसरात एका युवकाचा खून करून अर्धवट जाळलेल्या प्रकरणाचा चोवीस तासांत छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी एकास अटक केली आहे.
चंदप्पा धर्मण्णा कांबळे ( वय ३४, रा. आंबेवाड, ता. आळंद, जि. कलबुरगी) असे त्या मयत युवकाचे नाव आहे. तर सूर्यकांत शरणप्पा कांबळे ( रा. देवंती, ता आळंद, जि. कलबुरगी ) असे अटक केलेल्या. आरोपीचे नाव आहे. त्यास अक्कलकोट न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी दक्षिण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात बुधवारी दुपारी गुन्हा दाखल झाला होता. तपास पथकाची नेमणूक करून तपासाची चक्रे जलदगतीने फिरविली. त्यामध्ये गुन्ह्यातील मयत चंदप्पा कांबळे याची पत्नी सीताबाई चंदप्पा कांबळे हिचे ट्रकचालक आरोपी सूर्यकांत कांबळे याच्याशी सन २००७ पासून प्रेमसंबंध होते.
चंदप्पा हा सीताबाई आणि सूर्यकांत यांच्या प्रेमसंबंधाच्या अडसर ठरत होता. सूर्यकांत यानेच खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चंदप्पाचे प्रेत जाळले, असा संशय आला.
सूर्यकांत याच्या ठावठिकाणाबाबत माहिती काढली. तपास पथक पाठवून त्यास शेडम येथून ताब्यात घेतले. सूर्यकांतने बल्कर वाहनातून मंगळवारी खासगी कंपनीत नोकरी करणारा चंदप्पा कांबळे यास गावाकडे जाण्यासाठी म्हणून पुणे जिल्ह्यातील यवत येथून इंदापूर, सोलापूर, अक्कलकोट मार्गे घेऊन आला. वाटेत इंदापूर येथे त्याला दारू पाजून धारदार ब्लेडने चंदप्पा याच्या गळ्यावर वार करुन ठार मारले. आणि चंदप्पा याचे प्रेत मैंदर्गी गावाच्या पुढे लक्ष्मण निंगदळी यांच्या शेतामध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत टाकले. त्या प्रेतावर डिझेल टाकून पेटवून देवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे.