मी मरेन पण जामीन घेणार नाही -नितीन देशमुख
अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी नागपूरपर्यंत पाणी संघर्ष पदयात्रा काढली आहे. नागपूरच्या वेशीवर पोहोचताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस त्यांना घेऊन अमरावतीकडे रवाना झाले आहेत. मात्र यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी मरेन पण जामीन घेणार नाही असे म्हणत पोलिसांवर गृहमंत्रालयाचा दबाव असल्याचे म्हटले आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितिन देशमुख यांनी त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळवून देण्यासाठी संघर्ष यात्रा काढली. राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर खाऱ्या पाण्याच्या टँकरसह ते आंदोलन करणार होते. परंतु नागपूर ग्रामीण पोलिसांनी आमदार नितीन देशमुख यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना नागपूरपासून 30 किमीवरील धामणा येथेच अडवले.
अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील बहुतांश भाग हा खारपान पट्टा आहे. त्यामुळे नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून खारे पाणी प्यावे लागत आहे. खाऱ्या पाण्यामुळे या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आजार पसरलेले आहेत. लहान मुलांनाही हेच पाणी पाजावे लागत असल्याने लहान बालकांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.
नितीन देशमुख फडणवीस यांच्याकडे 2 हजार टिडीएस पाणी भरलेला टँकर घेऊन येणार होते. आणि त्यांना खारपाणपट्ट्यातील खारे पाणी पिण्यास देणार होते. बुधवारी त्यांची पाणी यात्रा वडधामना येथे आली. पोलिसांनी त्यांना नोटीस बजावून फडणवीसांच्या घरासमोर आंदोलन करण्यास मनाई केली होती.
परवानगी घेतली नाही-पोलिस
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंजूर झालेली जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती उठवण्याची मागणी यावेळी करण्यात येत आहे. यासाठीच ही ‘संघर्ष यात्रा’ काढण्यात आली. ही यात्रा आज नागपूरमध्ये दाखल होणार होती. मात्र, पोलिसांनी त्याआधीच नितीन देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. ही यात्रा काढण्यापूर्वी नितीन देशमुख यांनी परवानगी घेतली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
मरेन पण…
पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर आक्रमक झालेल्या आमदार नितीन देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पोलिसांनी कायद्याचा दुरुपयोग करत आम्हाला मारहाण केली. माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांवर गृहमंत्री फडणवीस यांचा प्रचंड दबाव आहे. मात्र, काहीही झाले तरी आम्ही माघार नाही. मी मरेन पण जामीन घेणार नाही.
टँकरमध्ये जमा केले पाणी
नागपूरला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी 69 गावातील महिलांनी जमा केलेले पाणी त्यांना देण्यात येणार होते. हे पाणी फडणवीसांना प्यायला देणार होते. जेणेकरुन या गावकऱ्यांच्या व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचतील. आमदार नितीन देशमुख यांच्या आंदोलकांचा ताफा या सर्व गावांतून फिरत एका टँकरमध्ये हे पाणी घेऊन निघाले होते.मात्र आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.