अमरावती बाजार समितीत सहकार पॅनलचीच सत्ता…
अमरावती २१०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या अमरावती-भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीवरही महाविकास आघाडी पुरस्कृत सहकार पॅनलचीच सत्ता आली आहे.
ही समिती ताब्यात घेण्यासाठी खासदार-आमदार राणा दाम्पत्याने भाजपला सोबत घेत जोरदार मोर्चेबांधणी केली होती. परंतु त्यांना एकही जागा जिंकता आली नाही.
सहकारात काँग्रेसची पाळेमुळे घट्ट
या जय-पराजयामुळे सहकारात काँग्रेसचीच पाळे-मुळे अधिक घट्ट असण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, इतरांना तेथे स्थान नाही, हे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी घोषित झालेल्या जिल्ह्यातील इतर पाच समित्यांमध्येसुद्धा सहकार पॅनललाच बहुमत मिळाले होते.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, राकाँचे सुनील वऱ्हाडे, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) प्रिती बंड यांनी या पॅनलची धुरा सांभाळली होती.
जिल्ह्यातील बारापैकी उर्वरित सहा समित्यांसाठी उद्या, रविवार, ३० एप्रिल रोजी मतदान होत आहे. मतदानानंतर लगेच निकालही घोषित केला जाईल. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत यापूर्वीही सहकार पॅनलचीच सत्ता होती. ती यानिमित्ताने कायम राखली गेली आहे.
असे आहेत विजयी उमेदवार
सेवा सहकारी संस्था मतदारसंघ १. संतोष इंगोले – ५५५ (सर्वसाधारण) २. प्रताप भुयार – ५३९ – (सर्वसाधारण) ३. भय्यासाहेब निर्मळ – ५२६ (सर्वसाधारण) ४. किशोर चांगोले – ५२१ (सर्वसाधारण) ५. हरिश मोरे – ५१० (सर्वसाधारण) ६. आशुतोष देशमुख – ५०२ (सर्वसाधारण) ७. नाना नागमोते – ४८३ (सर्वसाधारण) ८. रेखा कोकाटे – ५९१ (महिला राखीव) ९. अल्का देशमुख – ५५३ (महिला राखीव) १०. सतीश गोटे – ५६८ (व्हीजे-एनटी) ११. प्रकाश काळबांडे – ५५४ (ओबीसी)
ग्रामपंचायत मतदारसंघ
१२. प्रवीण अळसपुरे – ४७१ (सर्वसाधारण) १३. श्रीकांत बोंडे – ४२४ (सर्वसाधारण) १४. राम खरबडे – ४६९ (आर्थिक दुर्बल घटक) १५. मिलींद तायडे – ३५१ (एससी-एसटी) अडते आणि व्यापारी मतदारसंघ १६. राजेश पाटील – ४४५ १७. प्रमोद इंगोले – ४४४ हमाल-मापारी मतदारसंघ १८. बंडू वानखडे – २३१ कृषी उत्पन्न बाजार समितीत सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघातून ११, ग्रामपंचायत मतदारसंघातून ४, अडते-मापारी मतदारसंघातून दोन आणि हमाल-मापारी मतदारसंघातून एक संचालक निवडावयाचा होता. यातील शेवटचे तीन संचालक हे स्वतंत्रपणे निवडणूक मैदानात होते.
15 जागा सहकार पॅनलच्या पारड्यात
तर उर्वरित १५ जागांसाठी दोन्ही पॅनलने उमेदवार उभे केले होते. परंतु मतदारांनी मात्र सर्वच्या सर्व पंधराही जागा सहकार पॅनलच्या पारड्यात टाकल्या.
आगामी निवडणुकीची रिहर्सल
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीकडे आगामी काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीची रिहर्सल म्हणून पाहिले जात आहे.
…म्हणून त्यांना मतदारांनी फटकारले
खासदार-आमदार राणा आणि त्यांच्या सोबतीला बसलेल्या भाजपवाल्यांनी जिल्ह्यात वेळोवेळी शेतकरीहिताची भूमिका न घेता केवळ आव आणण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग मतदारांनी व्यक्त केला आहे. राणा दाम्पत्याने हनुमान चालिसाचे राजकारण केले. त्यासाठीचा योग्य धडाही त्यांना या निवडणुकीतून मिळाला आहे. अॅड. यशोमती ठाकूर, आमदार तथा माजी पालकमंत्री, अमरावती.
आज येथे होणार निवडणूक
जिल्ह्यात एकूण १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक घोषित झाली आहे. यापैकी सहा ठिकाणची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरित सहा ठिकाणी उद्या, रविवार, ३० एप्रिल रोजी मतदान व मतमोजणी केली जाईल. यामध्ये अचलपूर, चांदूरबाजार, वरुड, दर्यापूर, धारणी व धामणगाव रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे.