गुरुद्वारामध्ये महिलेची हत्या…
पंजाबमधील पटियाला येथील गुरुद्वारामध्ये एका महिलेची रविवारी रात्री 10 वाजता एका भाविकाने गोळ्या झाडून हत्या केली. गुरुद्वारा दु:ख निवारन साहिबच्या आवारातील तलावाजवळ ही महिला दारू पीत होती, असा आरोप आहे. या गोळीबारात एक सेवेकरी देखील जखमी झाला आहे. निर्मलजीत सिंग असे आरोपीचे नाव असून तो पटियाला येथील रहिवासी आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणात परविंदर कौर (32) असे मृत महिलेचे नाव आहे. ती गुरुद्वारामध्ये दारू पीत होती. त्यामुळे गुरुद्वाराच्या कर्मचाऱ्यांनीही तिला रोखण्याचा प्रयत्न केला. ते महिलेला चौकशीसाठी गुरुद्वाराच्या व्यवस्थापकाच्या खोलीत घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यानंतर तिने कर्मचाऱ्यांवर दारूच्या बाटलीने हल्ला केला.
आरोपीने 5 गोळ्या झाडल्या, 3 गोळ्या महिलेला लागल्या
सेवादार महिलेची विचारपूस करत असताना आरोपी निर्मलजीतने तेथे येऊन गोळीबार सुरू केला. निर्मलजीतने परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून पाच गोळ्या झाडल्या. महिलेला तीन गोळ्या लागल्या, तर सेवादार सागर कुमार यांनाही गोळी लागली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. सागरला राजिंद्र रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या पोटात गोळी लागली आहे.
हत्येनंतर आत्मसमर्पण
अनाज मंडी पोलिस ठाण्याचे एसएचओ म्हणाले की, आरोपींविरुद्ध खून आणि खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे रिव्हॉल्व्हरही जप्त करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर आरोपीने आत्मसमर्पण केले. वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.
आरोपीचा काही दिवसांपूर्वीच घटस्फोट
आरोपीच्या जवळच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे की, निर्मलजीत सिंग सैनी यांचा काही काळापूर्वी पत्नीपासून घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर तो तणावाखाली होता आणि नियमितपणे गुरुद्वारामध्ये दर्शनासाठी येत होता.