जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन…
यंदा जूनच्या पहिल्याच आठवड्यात भारतात मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच, यावर्षी सरासरी 96 टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला आहे. मुंबई आणि प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख सुनील कांबळे यांनी माध्यमांना मान्सूनबाबत ही माहिती दिली. ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनीही जून महिन्यात मान्सून भारतात वेळेवर किंवा वेळेआधी दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे.
यंदा सामान्य पाऊस
मागील आठवड्यात भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा सर्वसाधारण म्हणजेच 96 टक्के पाऊस होण्याचा अंदाज जाहीर केला होता. या अंदाजात 5 टक्के कमी-अधिक तफावत होऊ शकते. 96 ते 104 टक्के हा सामान्य पाऊस आहे. 110 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला तर अतिवृष्टी समजली जाते. 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला तर दुष्काळ समजला जातो. यंदा भारतात सर्वसाधारण पावसाचा अंदाज आहे. शेती तसेच अर्थव्यवस्थेसाठी ही समाधानाची बाब आहे.
मेअखेरीस पुन्हा अंदाज
हवामान विभागाकडून मे महिन्याच्या अखेरीस मान्सूनबाबत पुन्हा अंदाज वर्तवला जाणार आहे. त्यावेळी चित्र अधिक स्पष्ट होईल, असेही सुनील कांबळे यांनी सांगितले. महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन कधी होईल व त्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास कसा असेल? याबाबतची सविस्तर माहिती महिना अखेरीस सांगण्यात येणार असल्याचे सुनील कांबळे यांनी सांगितले.
तळकोकणात 7 जूनला मान्सून
भारतीय हवामान विभागाने मुंबईत यंदा 10 किंवा 11 जूनला मान्सूनचे आगमन होईल, अशी शक्यता वर्तवली आहे. तर, स्कायमेटनेही याबाबतचा अंदाज जाहीर केला आहे. स्कायमेटनूसार, तळकोकणात 7 जूनला मान्सूनचे आगमन होईल. तर, मुंबईत 11 जूनला मान्सूनचे आगमन होईल.
अल निनोचा फार प्रभाव नाही
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय हवामान विभागाचा नवा अंदाज येणार आहे. त्यावेळी अल निनोच्या परिणामासंदर्भात अधिक माहिती दिली जाणार आहे. यंदा अल निनो असणार, परंतु त्याचा मोठा प्रभाव नसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतात जुलै महिन्यात अल निनो सक्रिय होत आहे. आतापर्यंत 15 वेळा अल निनो सक्रीय असताना मान्सून 6 वेळा अतिवृष्टी देऊन गेला आहे.
अंदमानात मान्सून निर्धारीत वेळेत
सध्याच्या हवामान स्थितीनुसार मान्सून अंदमान समुद्रात निर्धारित वेळेत पोहोचण्याची शक्यता दिसून येत आहे. साधारणपणे अंदमानात मान्सून 20 ते 21 मेपर्यंत पोहोचून तो आपला प्रवास या निर्धारित तारखेपर्यंत पूर्ण करेल, कदाचित त्यापूर्वीही पूर्ण करेल, अशी सध्या हवामान स्थिती असल्याचे सांगण्यात आले आहे.