पोपट मातोश्रीत एंट्री करत होता, तेव्हा चांगला होता का ? – नारायण राणे
उद्धव ठाकरे, संजय राऊत हे सत्ता गेल्यामुळे डिप्रेशनमध्ये आहेत. पोपट शिवसेनेत असताना जिवंत होता. भरारी घेत होता. पंखावर काही तरी घेऊन मातोश्रीत एंट्री करत होता. तेव्हा चांगला होता का, असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
लोकशाहीमध्ये हार-जीत होत असते. मात्र, सोळा-सोळा आणि अठरा-अठरा तास काम करणारे नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची तुलना कशी होऊ शकते, म्हणत त्यांनी कर्नाटक विधानसभेच्या निकालावर उत्तर दिले.
ही भाषा नव्हे
सर्वोच्च न्यायालयाने मेलेल्या पोपटाविषयी भाष्य केले आहे. पोपट मेलाच आहे. फक्त ते विधानसभा अध्यक्षांनी जाहीर करायचे आहे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्याचा समाचार घेताना नारायण राणे म्हणाले की, संजय राऊतांना सध्या काहीही कामधंदा नाही. पोपट मेला वगैरी ही त्यांची भाषा आहे का, असा सवाल त्यांनी केला.
अपशब्द बोलू नयेत
नारायण राणे म्हणाले की, पोपट शिवसेनेत होता तेव्हा जिवंत होता. भरारी घेत होता. पंखावर काही तरी घेऊन मातोश्रीत एंट्री करत होता. तेव्हा चांगला होता. आता पोपट मेला. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणीही असो. त्यांच्याबद्दल कोणीही अपशब्द बोलू नयेत. संजय राऊत, उद्धव ठाकरे हे सत्ता गेल्यामुळे सध्या डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे वेड्यासारखे बडबडत आहेत. हे लोक चांगले बोलू शकत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
मंत्रालयात दोनच तास
नारायण राणे यांनी यावेळी उद्धव ठाकरेंवर तोंडसुख घेतले. ते म्हणाले, ज्या माणसाने अडीच वर्षांत एकही नोकरी दिली नाही. तरुणांसाठी एकही उपक्रम राबवला नाही. जो रिकाम टेकडा माणूस अडीच वर्षांत दोन तासच मंत्रालयात गेला. त्याच्या बरोबरीत मोदी रोज सोळा ते अठरा तास काम करतात. लोकशाहीत हार-जीत, निवडणुका होत असतात, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
अर्थव्यवस्थेत पाचवा क्रमांक
नारायण राणे पुढे म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याला जेव्हा शंभर वर्षे होतील, तेव्हा आपला देश आत्मनिर्भर बनेल. महासत्ता बनेल. त्यासाठी ज्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत त्यांनी योगदान द्यावे. भारत प्रगतीकडे चालला आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत पाचव्या क्रमांकावर आला आहे. 2030 मध्ये तो तिसऱ्या क्रमांकावर येईल. जागतिक पातळीवर अर्थव्यवस्थेमध्ये भारताची प्रगती चालली आहे. तरुणांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांना सार्वजनिक पातळीवर नियुक्तीपत्र दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.