संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील – नीतेश राणे
संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहे, अशा शब्दांत भाजप नेते नीतेश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
गौतमीने राऊतांना मेकअपचे सामान पाठवावे
आज पत्रकार परिषदेत नीतेश राणे म्हणाले, संजय राऊत हे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहे. गौतमी पाटील ज्याप्रमाणे लोकांची करमणूक करते. त्याचप्रमाणे संजय राऊत रोज सकाळी टीव्हीवर येऊन आपणही लोकांचे करमणूक करत असल्याचा दावा करतात. माझी गौतमी पाटील यांना विनंती आहे की, त्यांनी आपल्याकडील थोडे पावडर व मेकअपचे सामान संजय राऊतांना पाठवून द्यावे. संजय राऊतांना ते कामी येईल. थोडासा चेहरा चांगला होईल.
नीतेश राणे म्हणाले, गौतमी पाटील उत्तम कलाकार आहे आणि लोकप्रियही असेल. तिला पाहायला लोकांना आवडते. तसेच या महाविकास आघाडीच्या गौतमी पाटीलला वाटते की, लोकांना त्याला पाहायला आवडते. तो गैरसमज दूर झाला पाहिजे.
गोतमी फार लोकप्रिय, संजय राऊत छोटे – शिरसाट
शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनीदेखील गौतमी पाटीलचा उल्लेख करत संजय राऊतांवर टीका केली. संजय शिरसाट म्हणाले, गौतमी पाटील व संजय राऊत यांची तुलना होऊ शकत नाही. गौतमी पाटीलपेक्षा संजय राऊत फार लहान आहेत. गौतमी पाटील ही कार्यक्रम करून लोकांचे मनोरंजन करते. तिच्या कार्यक्रमाला पोलिसांना लाठीचार्ज करावा लागतो. तिची लोकप्रियता अफाट आहे. दुसरीकडे, संजय राऊत हे मनोरंजन करत नाही तर टीव्हीवर येऊन लोकांचे डोक खातात.
संजय शिरसाट म्हणाले, गौतमी पाटीलएवढी संजय राऊतांची लोकप्रियता नाही. ते टीव्हीवर आलेल की डोके दुखायला लागते. त्यामुळे लोक टीव्ही बंद करून टाकतात. त्यामुळे गौतमी पाटीलची तुलना संजय राऊतांसोबत करणे चुकीचे आहे, असा टोला संजय शिरसाटांनी लगावला.
हिनवण्याचा अधिकार कुणी दिला?
दरम्यान, गौतमी पाटीलबाबत नीतेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. रुपाली ठोंबरे-पाटील म्हणाल्या, स्वत:चे पोट भरण्यासाठी गौतमी पाटील नृत्याचे कार्यक्रम करते. स्वत:च्या मेहनतीवर ती आपला उदरनिर्वाह करते. तिच्या काही चुका झाल्या असतील. मात्र, गौतमी पाटीलला हिनवण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?, असा सवाल रुपाली ठोंबरे-पाटील यांनी नीतेश राणेंना केला. तसेच, एका महिलेचा अपमान करून राजकीय टीका करणे योग्य नाही, असेही त्यांनी सुनावली.