बांगर यांनी लग्नाला हजेरी लावताच ‘पन्नास खोके एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरू
हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांची एका लग्न समारंभात चांगलीच गोची झाली. बांगर यांनी लग्नाला हजेरी लावताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’ची घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे त्यांचा चेहरा चांगलाच पाहण्यालायक झाला.
मंडप परिसरात सुरू झालेल्या घोषणाबाजीमुळे संतोष बांगर यांनीही लवकरच पाय काढता घेतला. या घोषणाबाजीचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
नेमके झाले काय?
पाथरी तालुक्यातल्या देवेगाव (जि. परभणी) येथे सोमवारी एक लग्न सोहळा पार पडला. या लग्नाला खासदार बंडू जाधव, आमदार संतोष बांगर यांनी हजेरी लावली. यावेळी बंडू जाधव अगोदरपासूनच उपस्थित होते. त्यानंतर आलेले शिंदे गटाचे संतोष बांगर यांनी ठाकरे गटाचे बंडू जाधव यांना चरणस्पर्श करत त्यांचा आशीर्वाद घेतला. अन् अचानक घोषणाबाजी सुरू झाली.
कार्यकर्ते आक्रमक…
कार्यकर्त्यांनी आधी, ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, उद्धव ठाकरे यांचा विजय असो’, ‘बॉस तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा दिल्या. तोपर्यंत सारे ठीक होते. मात्र, अचानक त्यांनी ‘पन्नास खोके, एकदम ओक्के’ची घोषणाबाजी सुरू केली. तेव्हा बंडू जाधव यांचे चरणस्पर्श करणाऱ्या संतोष बांगर यांची चांगलीच गोची झाली. त्यांचा अक्षरशः चेहरा ओशाळला.
समजूत काढली…
संतोष बांगर यांनी घोषणाबाजी सुरू असताना गप्प राहणे पसंद केले. मात्र, वधू – वर आणि वऱ्हाडी मंडळी कावरी-बावरी झाली. यजमानांची गोची झाली. काही ज्येष्ठांनी पुढाकार घेत कार्यकर्त्यांना आवरले. हे राजकीय व्यासपीठ नाही. लग्नात विघ्न आणू नका, अशी विनंती केली. त्यानंतर घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते शांत झाले.
बंड पिच्छा सोडेना…
एकनाथ शिंदे यांनी बंड केले. उद्धव ठाकरेंना एकटे पाडले. हे सारे केवळ सत्तेपायी झाले, अशी भावना निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे नेते कुठेही असले, तरी कडवा शिवसैनिक ठाकरेंसोबत आहे. याचा प्रत्यय वारंवार येतो. या अंसतोषालाच संतोष बांगर यांना सामोरे जावे लागले.