नवापूर नाशिक एस.टी. बस अन् ट्रकचा भीषण अपघात
धुळे-सुरत महामार्गावरील विसरवाडी गावाजवळ शेरे पंजाब हॉटेल समोर सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नवापूर नाशिक एस.टी. बस अन् ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून बसमधील सुमारे 10-12 प्रवासी जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर आगाराची नवापूर नाशिक बस क्रमांक एम एच 06 एस 8496 सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास नवापूर हून प्रवाश्यांना घेऊन नाशिक जाण्यासाठी निघाली विसरवाडी गावाच्या पुढे महामार्गावर शेरे पंजाब हॉटेल समोर आल्यावर धुळ्याहून नवापूरच्या दिशेने समोरुन येणारी ट्रक क्रमांक टी. एन. 52 ए ए 2613 सोबत बसची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने भीषण अपघात झाला.
या अपघातात ट्रक चालक प्रकाश (तामिळनाडू) याचा मृत्यू झाला असून बसमधील सुमारे 10-12 प्रवासी जखमी झाले आहेत. विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात बसमधील प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी दाखल करून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून काही गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
अपघात एवढा भीषण होता की बस व ट्रकचा समोरासमोरील भाग हा अपघातामुळे चक्काचूर झाला असून बसमधील बहुतेक प्रवासी नवापूर तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. तसेच अपघात पाहण्यासाठी महामार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली असून घटनास्थळी विसरवाडी पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी दाखल झाले होते.