दहावीच्या विद्यार्थ्याचा हात तुटलेला मृतदेह सापडल्याने खळबळ; प्रेमप्रकरणातून काटा काढल्याचा संशय
दहावीच्या विद्यार्थ्याचा दोन्ही हात तुटलेला मृतदेह वैजापूर तालुक्यातल्या बोरसरमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सचिन प्रभाकर काळे असे मृत तरुणाचे नाव आहे.
बोरसरमध्ये सचिनचा मृतदेह सापडल्याचे समजताच एकच जमाव जमला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. हा खून असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
नेमके प्रकरण काय?
बोरसरमधला सचिन दहावीला होता. तो विनायक नगरच्या शाळेतून 24 फेब्रुवारी रोजी निघून गेला. तो कुठे गेला, त्याचे काय झाले याची कोणालाही माहिती नव्हती. तो घरी परतला नसल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. आता त्याचा दोन्ही हात तोडलेला मृतदेह सापडल्याने गावात एकच खळबळ उडाली असून, नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप आहे.
प्रेमप्रकरणातून कृत्य?
सचिनचे गावात एका तरुणीसोबत प्रेमप्रकरण सुरू होते. त्यातूनच हा खून झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सचिनच्या ज्या मुलीसोबत मैत्री होती, तिच्या शेतामध्येच त्याचा मृतदेह सापडला. पोलिसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे. यापूर्वी औरंगाबादमध्ये प्रेमप्रकरणातून संकेत कुलकर्णी याची निर्घृण हत्या झाली होती. त्याला चारचाकी गाडीखाली चिरडण्यात आले. त्या खटल्याची सध्या सुनावणी सुरू आहे. त्यानंतर हे प्रकरण घडल्याचे समोर आले आहे.
पोलिसांचा तपास सुरू
सचिनच्या खुनामुळे त्याचे वर्गमित्र हादरले आहेत. पंचक्रोशीत या खुनाबद्दल आणि क्रूर कृत्याबद्दल हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे. इतक्या टोकाचे पाऊल उचलत जीव घेतल्याने पोलिसांसमोरही तपासाचे मोठे आव्हान आहे. पोलिसांनी पंचनामे करून तपासाची चक्रे फिरवल्याचे समजते. काही व्यक्ती त्यांच्या रडार आहेत. आता ते कोणाची केव्हा आणि कशी चौकशी करतात, हे पाहावे लागेल. मात्र, या खुनामागे नेमके कोण, याची चांगलीच चर्चा रंगली आहे.