सोलापुरात लव्ह जिहादच्या संशयावरून तरुणास बेदम मारहाण; तरुणीने दिला हा जबाब
सोलापूर: सोलापूर येथे लव्ह जिहादच्या संशयावरून एका मुस्लिम तरुणाला एका टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मारहाणीत तरुण हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तरुणीने महत्वाचा जबाब दिला आहे. आम्ही लव्हर नसून भाऊ बहिणी सारखे असल्याचे तरुणीने म्हटले आहे. सोलापुरातील एम्प्लॉयमेंट चौक परिसरात ही घटना १ मार्च रोजी घडली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे.
मुजाहिद पठाण (वय ३० वर्ष, रा. सोलापूर) असे मुस्लिम तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या छातीमधील बरगड्यांना दुखापत झाली. एका हिंदू तरुणीशी तुझे काय संबंध आहेत, तू मुस्लिम आहेस, असे म्हणत त्याला चोपले. तसेच पीडित हिंदू तरुणीस देखील दमदाटी करण्यात आली आहे. तिच्या नातेवाईकांना देखील मुलीबद्दल खोटी माहिती देण्यात आली आहे.
पीडित तरूणी व मुस्लीम तरुण मुजाहिद पठाण याचे गेल्या अनेक वर्षांपासून कौटुंबिक नाते आहे. दोघे सोलापुरातील एका खाजगी कार्यालयात काम करत होते. मुजाहिद याचे लग्न झाले असून पीडित तरूणी ही अविवाहित व शिक्षण घेत आहे. शैक्षणिक कामानिमित्त पीडित हिंदू तरूणीने मुजाहिदला १ मार्च २०२३ रोजी एम्प्लॉयमेंट चौक येथे बोलावले होते. कामानिमित्त वेळ लागत असल्याने दोघे आईस्क्रीम खाण्यासाठी आईस्क्रीम पार्लरमध्ये गेले.
दरम्यान, पीडित हिंदू तरूणी व मुजाहिद पठाण हे दोघे आईस्क्रीम खात असताना हिंदू संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी आले. तू हिंदू असून मुस्लीम तरुणाशी बसतेस का असा जाब विचारू लागले. पीडित तरुणीने अनेक विनवण्या केल्या, पण काहीएक ऐकण्यात आले नाही. ओळखपत्र पाहून तरूणीच्या नातेवाईकांना हिंदू संघटनेच्या तरुणांनी तुमच्या मुलीचे मुस्लीम तरुणाशी अनैतिक संबंध आहेत असे सांगत तिला आईस्क्रीम पार्लरमधून बाहेर काढले. मुजाहिद पठाणला जय श्रीरामचे नारे देत मारहाण केली.
दरम्यान, पीडित तरुणीने मुस्लिम तरुणाची बाजू घेत, आमचे अनैतिक संबंध नसून, कौटुंबिक व भाऊ बहिणीसारखे संबंध असल्याची माहिती दिली. हिंदू संघटनांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात लेखी अर्ज देखील दिला असल्याची माहिती पीडित तरुणीने दिली आहे.