SOLAPUR:हातभट्टी दारू वाहतुकीला पुन्हा दणकातीन वाहनांसह 1580 लिटर हातभट्टी दारू जप्त माढ्यातही गोवा दारू पकडली
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी टाकलेल्या छाप्यात मुळेगाव तांड्यावरून सोलापूर शहर परिसरात वाहतूक होणारी 1580 लिटर हातभट्टी दारू व तीन वाहने जप्त करण्यात आली. तसेच शुक्रवारी आढेगाव (ता.माढा) येथे बहात्तर हजार रुपये किमतीची गोवा निर्मित विदेशी दारू जप्त करून गुन्हा नोंदविण्यात आला.
सविस्तर वृत्त असे की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. याच मोहिमेदरम्यान शनिवारी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क ब विभागाने सोलापूर शहरात मुळेगाव तांडा परिसरातून येणाऱ्या हातभट्टी दारूची तीन वाहने पकडली आहे. या कारवाईदरम्यान दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने मुळेगाव ते दोड्डी रोडवर किरण श्रीमंत राठोड, वय 34 वर्षे राहणार मुळेगाव तांडा या इसमास त्याच्या युनिकॉर्न कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक MH12 JH 0307 वरून सहा रबरी ट्यूब मध्ये 480 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करतांना पकडले. दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद यांच्या पथकाने राहुल बाबू राठोड वय 28 वर्षे राहणार सिताराम तांडा याला बक्षीहिप्परगा ता. दक्षिण सोलापूर जिल्हा परिषद शाळेच्या समोर ऑटो रिक्षा क्रमांक MH13 CT7694 मधून 500 लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले. तसेच निरीक्षक नंदकुमार जाधव यांच्या पथकाने मुळेगाव तांडा परिसरातील हैदराबाद- सोलापूर रोडवर पाळत ठेवून अंकित शिवाजी राठोड वय 21 वर्षे राहणार मुळेगाव लमाण तांडा याला निळ्या रंगाच्या ह्युंदाई कार क्रमांक MH 12 FB 9638 मधून सहा रबरी ट्यूबमध्ये सहाशे लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले. या तिन्ही कारवाईत चार लाखांच्या वाहनांसह एक लाख 59 हजार 700 रुपये किमतीची दारू असा एकूण पाच लाख 59 हजार 700 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुक्रवारी निरीक्षक माळशिरस यांच्या पथकाने अंकुश भागवत वाघमारे, वय 34 वर्षे याला होंडा एक्टिवा क्रमांक MH 05 DT 1745 मधून एका रबरी ट्यूब मधून शंभर लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातून 55 हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. निरीक्षक पंढरपूर पंकज कुंभार यांच्या पथकाने शुक्रवारी उंबरे (ता. पंढरपूर) गावाचे हद्दीत सचिन धोंडीराम जाधव, वय 44 वर्षे याला मोटरसायकल MH13 CF7553 वरून तेरा हजार चारशे चाळीस रुपये किमतीच्या देशी दारूची वाहतूक करताना पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दुय्यम निरीक्षक दत्तात्रय पाटील यांना मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार त्यांनी शुक्रवारी आढेगाव ता. माढा येथील आढेगाव ते टाकळी रोडवरील एका शेतातील उसामध्ये लपवून ठेवलेला गोवा राज्य निर्मित विदेशी दारुचा साठा जप्त केला. या कारवाईत गोवा राज्य निर्मित रियल सेवन विदेशी दारुच्या 750 मिली क्षमतेच्या एकूण 144 बाटल्या ज्याची किंमत अंदाजे 72 हजार रुपये इतकी आहे जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्याचा सुरू आहे . हातभट्टी दारूच्या वाहतुकी सोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी मुळेगाव व बक्षी हिप्परगा तांडा ता. दक्षिण सोलापूर येथील वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात नोंदविलेल्या एकूण आठ गुन्ह्यात 260 लिटर हातभट्टी दारू व अठरा हजार दोनशे लिटर गुळमिश्रित रसायन असा एकूण सात लाख चार हजार चारशे किमतीचा मुद्देमाल जप्त करून नाश करण्यात आला.
ही कारवाई जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक संजय पाटील,निरीक्षक नंदकुमार जाधव, जगन्नाथ पाटील, सुनील कदम,पंकज कुंभार, सचिन भवड, दुय्यम निरीक्षक धनाजी पोवार,समाधान शेळके, सुखदेव सिद, मानसी वाघ, सचिन गुठे, दत्तात्रय पाटील, बाळू नेवसे, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे व सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, आवेज शेख, मुकेश चव्हाण, गजानन होळकर, जीवन मुंढे व जवान व वाहन चालक इत्यादी कर्मचाऱ्यांनी पार पाडली.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 240 गुन्हे नोंदविण्यात आले असून 31वाहनांसह नव्वद लाख छत्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.