सोलापुरात काँग्रेस नेते राहुल गांधींची 24 एप्रिलला जाहीर सभा
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून ठिकठकाणी इंडिया आघाडीच्या स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील जाहीर सभा घेऊन आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करत आहेत. दरम्यान, सोलापूर येथे देखील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ 24 एप्रिल रोजी राहुल गांधी यांची जाहीर सभा पार पडणार आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 7 मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा बुधवार दिनांक 24 एप्रिल रोजी सोलापूर शहरातील मरीआई चौकातील एक्झिब्युशन ग्राउंड येथे दुपारी 3 वाजता पार पडणार असल्याची माहिती निवडणूक प्रमुख प्रकाश यलगुलवार, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, आणि काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांनी दिली.
सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांची लढत चुरशीची होत आहे. सध्या प्रणिती शिंदे या गावभेट दौरे करून मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. प्रणिती शिंदे यांच्या प्रचाराचा वेग वाढला असून मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दरम्यान शिंदे यांच्या प्रचारासाठी नुकतेच काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील आणि अमित देशमुख यांच्या जाहीर सभा पार पडल्या. त्यानंतर राहुल गांधी देखील आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. तरी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राहुल गांधी यांच्या सभेला उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले.