सोलापुर – शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यास 4 वर्षाची शिक्षा
आठ वर्षांनंतर लाच प्रकरणात चार वर्षाची शिक्षा ; शिक्षण विभागातील हे होते कर्मचारी
प्रलंबित पगार, बक्षीस बिल व उर्वरित रक्कम काढण्यासाठी लाचेची मागणी करून २३ हजार रुपये स्विकारल्याचा आरोप न्यायालयात सिध्द झाल्याने येथील जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ श्रेणी लिपिक संतोष जनार्दन ठाकूर याच्यासह दोन दोषींना ४ वर्षे कैदेची व प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, येथील वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक कार्यालयातील तत्कालीन वरिष्ठ श्रेणी लिपिक संतोष जनार्दन ठाकूर यांनी व अन्य एक जणाने तक्रारदाराकडे प्रलंबित पगार, बक्षीस बिल व उर्वरित रक्कम काढण्यासाठी लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर, त्या तक्रारीची पडताळणी करून तत्कालीन उपअधीक्षक गणेश जवादवाड यांनी, सापळा रचून २३ हजार रुपयांची लाच स्विकारताना ठाकूर व श्री महालक्ष्मी प्रशाला, सोलापूरचे तत्कालीन प्रयोगशाळा परिचर उमेश प्रकाश काळे यांना रंगेहाथ पकडले होते. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७,१२,१३(१)ड सह १३(२) अन्वये अन्वये संतोष ठाकूर व उमेश काळे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून तपास अधिकारी तत्कालीन उपअधीक्षक गणेश जवादवाड यांनी दोन्ही आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यावर जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यात संतोष ठाकूर (सेवानिवृत्त) व उमेश काळे यांच्याविरुध्द आरोप न्यायालयात सिद्ध झाल्याने जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश योगेश राणे यांनी दोन्ही दोषींना प्रत्येकी चार वर्षे कैदेची शिक्षा आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पैरवी अधिकारी म्हणून लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाचे उप अधीक्षक गणेश कुंभार यांनी पैरवी अधिकारी कोर्ट पैरवी अंमलदार म्हणून सहाय्यक पोलीस फौजदार एस. व्हि.कोळी,पो.ना. संतोष नरोटे आणि एपीपी म्हणून दत्ता पवार यांनी कर्तव्य बजावले