पत्नीस जबरदस्तीने फिनेल पाजले : पतीची जामीनावर मुक्तता
सोलापूर- दि.17/04/24 रोजी रात्री फिर्यादी सौ. संतोषी रविकुमार चाबूकस्वार, वय-29, रा. चांभार गल्ली, जोडभावी पेठ, सोलापूर हिस तिचा पती आरोपी नामे रविकुमार मल्लिनाथ चाबूकस्वार, वय- 34 वर्षे, रा. सोलापूर याने ” तू माझ्या विरुध्द पोलीस ठाण्यात तक्रार कां केली ? असे म्हणून घरातील बाथरुममध्ये ठेवलेली फिनेलची बाटली घेऊन त्यातील फिनेल फिर्यादी पत्नीस बळजबरीने पाजल्या प्रकरणी फिर्यादी हिने दि.25/04/2024 रोजी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन सोलापूर येथे पती व इतर नातेवाईकांविरुध्द फिर्याद दाखल केली.
सदर गुन्ह्यात पोलीसांनी आरोपीस अटक केली. सदर गुन्ह्याचा तपास श्रीमती शबनम शेख, पोलीस निरिक्षक (गुन्हे) जोडभावी पेठ, सोलापूर यांनी करुन आरोपीविरुध्द दोषारोपत्र न्यायालयात दाखल केले. सदर आरोपी याने जामीनासाठी मे. जिल्हा व सत्र न्यायालयात अॅड. सचिन इंगळगी यांचे मार्फत अर्ज दाखल केला असता सदर सुनावणीचेवेळी अॅड. सचिन इंगळगी यांनी असा युक्तीवाद केला की, सदर फिर्यादी ही स्वतःच फिनेलची बाटली हातामध्ये घेतल्याचा फोटो मे. न्यायालयाचे निदर्शनास आणून दिला व सदरची फिर्याद देण्यास 6 दिवसाचा विलंब झाल्याचे मे. न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले. त्यावरुन मे. जिल्हा न्यायाधिश -3 (एस.व्ही. केंद्रे साहेब) यांनी आरोपीची रक्कम रुपये विस हजारच्या जातमुचलक्यावर मुक्त केले.
यात सरकार तर्फे अॅड. गंगाधर रामपूरे यांनी तर आरोपी तर्फे अॅड. सचिन एच, इंगळगी यांनी काम पाहिले.