सोलापूर प्रश्नावरच संसदेतील मौन संपलं…
देशाच्या संसदेमध्ये पहिल्या अधिवेशनातच सोलापूर जिल्ह्यातील तीनही खासदारांनी जिल्ह्याचे, राज्याचे विविध घटकांचे प्रश्न मांडले आहेत. चर्चेमध्ये सहभाग घेतला आहे. याबाबतचे वृत्तांत सध्या सर्वत्र येत आहेत. दोन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत आपण निवडून दिलेले खासदार हे मौनी नाहीत, अभ्यासू आहेत लोकांचे प्रश्न जाणून आहेत. प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काही भूमिका घेत आहेत ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. गेली काही वर्ष सोलापूरचं प्रतिनिधित्व संसदेत करणारी मंडळी, संसदेत बोलत नव्हती. जाहीर कार्यक्रमांमध्येही काही मत व्यक्त करीत नव्हती. एक खासदार महाशय तर दर गुरुवारी मौन व्रत पाळत असत. म्हणजे येणार्या लोकांशीही ते संवाद साधत नव्हते. लोकप्रतिनिधींची ही भूमिका तसं पाहता रुचणारी नाही. आपण दुसरी बाजू अशीही पाहतो आहोत की देशाच्या केंद्र आणि राज्यांच्या विधिमंडळामध्ये अनेक लोकप्रतिनिधी अनावश्यक भाष्य करत आहेत. एकमेकांवर टीकाटिप्पणी, पराकोटीची भडकाऊ भाषण होत आहेत. यामुळे समाज व्यवस्थेत सुधारणा होण्याऐवजी वातावरण अधिक बिघडत आहे. सोलापूर शहर जिल्ह्याच्या तीन पैकी दोन खासदारांनी प्रथमच संसदेत प्रवेश केला आहे. ते तरुण आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील या पट्टीच्या आणि अनुभवी राजकारण्यांच्या मुशीतून तयार झालेली ही मंडळी आहेत. शहर-जिल्ह्याचे, समाजाचे काय प्रश्न आहेत? याचे बाळकडू त्यांना बर्याच वर्षापासून मिळाले आहेत. प्रणिती आणि धैर्यशील दोघांचेही वक्तृत्व चांगलं आहे. आपण अशी आशा ठेवूया की, या खासदारांच्या काळामध्ये सोलापूर शहर जिल्ह्याचे अनेक प्रश्न ऐरणीवर येतील आणि ते सुटतीलही. या नेत्यांनी आपली राजकीय भूमिका काय असावी हा त्यांचा प्रश्न. पण जनतेच्या प्रश्नावर प्रसंगी सरकारशी दोन हात, प्रसंगी सामोपचार ही भूमिका ही घेतली पाहिजे. कारण प्रश्न सुटणं महत्त्वाचं आहे. अनेकदा असं दिसून यायचं सोलापूरचे ज्वलंत प्रश्न राष्ट्रीय नेत्यांच्या समोर मांडलेही जात नाहीत. प्रश्न काय आहेत हेच सत्ताधार्यांपर्यंत गेलं नाही तर सुटणार कसे? प्रणिती शिंदे यांनी पंधरा वर्षे महाराष्ट्र विधिमंडळात सोलापूर शहर मध्यच नेतृत्व केलं. त्यांना सोलापूरचे सर्व प्रश्न सत्तेत आणि विरोधी बाकावर असताना चांगले ज्ञात झाले आहेत. या अनुभवाचा फायदा त्यांना देशाच्या संसदेत मिळत आहे. नुकताच त्यांनी सोलापूरच्या आयटी पार्क, विमानतळ, रस्ते, आरोग्य असे विविध विषय हाताळले आहेत. संसदेत सरकारच्या कार्यपद्धती विरुद्धही त्यांनी आक्रमकपणे पक्षाची बाजू मांडली. पक्ष भूमिके विषयी मत मतांतर असू शकतात. पण समस्त सोलापूरकरांना आपल्या खासदार बोलतात, प्रश्न मांडतात याविषयी समाधान आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनीही प्रश्न मांडण्याची संधी सोडलेली नाही. त्यांनाही ग्रामीण भागाच्या प्रश्नांची चांगलीच जाण आहे. या काळामध्ये सोलापूरचे केंद्रीय पातळीवरचे सारे प्रश्न ते मार्गी लावतील अशा सदिच्छा शुभेच्छा ठेवूया. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर ज्यांच्या कार्यक्षेत्रात सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका येतो. त्यांनी आधीच अनेकांना आपल्या जनसंपर्कामुळे आपलंसं केलं आहे. लोकांच्या प्रत्येक अडीअडचणीच्या वेळी ते तातडीने धावून येतात अशी प्रतिमा आहेच. त्यांनीही संसदेच्या सत्रात प्रश्न मांडण्याची संधी सोडलेली नाही. यापूर्वीही त्यांनी संसदेत धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याचे रेल्वे आणि अन्य विभागाचे प्रश्न मांडलेलेच आहेत. आपले खासदार बोलके आहेत, प्रश्न मांडतात, मौनी नाहीत हे चांगलेच आहे. आता इतकं चांगलं वातावरण असताना सोलापूरचे मूलभूत प्रश्न विशेषत: आरोग्य, दळणवळण आणि बेरोजगारी यासाठी उभय खासदारांनी एकजुटीने प्रयत्न करावेत. त्यांच्या या एकजुटीमध्ये राजकीय द्वेष सरकारविरोधी द्वेष कमी दिसावा. अभ्यासूपणा आहेच, तळमळ आहेच ती जनतेच्या कामी यावी. केवळ प्रसिद्धीस्टंटसाठी भाषणं नको. आपले खासदार मौनी नाहीत हे चांगलच आहे पण केवळ बोलघेवडे आहेत अशीही प्रतिमा पुढील काळात होणार नाही हे त्यांनी कामाचा उरक वाढवून दाखवून द्यावं.
अविनाश सी.कुलकर्णी