सोलापूर विद्यापीठात एनएसएस विद्यार्थ्यांकडून 22 हजार वृक्षांची झाली लागवड!
पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनीही नोंदविला सहभाग
सोलापूर, दि. 11- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने यंदाच्या वर्षी एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला असून आतापर्यंत 22 हजार वृक्षांची लागवड झाली आहे. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या प्रेरणेतून व राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि अभियांत्रिकी विभागाच्या सहकार्यातून वृक्ष लागवडीची मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या शहरातील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात येऊन मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करीत आहेत. बुधवारी डी. ए. व्ही. वेलणकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले. यावेळी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनीही वृक्षारोपणस्थळी भेट देऊन वृक्षारोपण केले. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, राष्ट्रीय सेवा योजने विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून राबविण्यात येत असलेल्या एक लाख वृक्ष लागवड उपक्रमाचे कौतुक करून यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी प्राप्त परिस्थितीत अभ्यास, कष्ट करून मोठ्या जिद्दीने स्पर्धा परीक्षा देऊन जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. वृक्षारोपणासाठी विद्यापीठाने विविध रोपे तयार केले आहेत. त्याचबरोबर मान्यवर व संस्थांकडूनही विद्यापीठास रोपे भेट देण्यात येत आहेत. संगणकशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. विकास घुटे यांनी 61 रोपे, डॉ. विकास कडू 51 रोपे, माऊली निंबाळकर 51 रोपे आणि शितल कांबळे या विद्यार्थ्यांनीने 22 रोपे भेट दिली आहेत.
विद्यापीठाच्या परिसरात सदरील वृक्षारोपण सुरू असून आतापर्यंत माऊली महाविद्यालय वडाळा, लोकमंगल महाविद्यालय वडाळा, कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर, देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ आणि दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले आहे. दररोज एका महाविद्यालयास विद्यापीठाकडून वृक्षारोपणासाठी बोलण्यात येत आहे. आणखीन 15 महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण होणार आहे.
फोटो ओळी:
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने नवीन कॅम्पस परिसरात वृक्षारोपण करत असताना पोलीस आयुक्त एम. राजकुमार, कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, राष्ट्रीय सेवा योजने विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे व अन्य.