महाराष्ट्राची घोडदौड, दोन्ही संघाचा बाद फेरीत प्रवेश
कुमार व मुली गटाच्या 43व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुले व मुलींच्या संघाने बाद फेरीत प्रवेश केला आहे. बाद फेरीत महाराष्ट्राच्या मुली छत्तीसगडबरोबर तर मुले कोल्हापूरबरोबर लढतील.
अलिगड (उत्तरप्रदेश) येथील महाराणी अहिल्याबाई होळकर स्पोर्टस स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत शेवटच्या साखळी सामन्यात भरतसिंग वसावेने (2.10 मि. 4 गुण) व आशिश गौतम (2.40, 1.40 मिनिटे व 4 गुण) यांच्या अष्टपैलू खेळीमुळे महाराष्ट्राच्या मुलांनी पुद्देचरीवर 39-24 असा एक डाव राखून 15 गुणांनी दणदणीत विजय मिळविला. जितेंद्र वसावे व सोत्या वळवी यांनी आपल्या धारदार आक्रमणात प्रत्येकी 8 गडी बाद करीत त्यांना साथ दिली. पुद्देचरीकडून स्टेफनन 6 गडी बाद केले.
महाराष्ट्राच्या मुलींच्या शेवटच्या साखळी सामन्यात यजमान उत्तरप्रदेशचा 28-5 असा एक डाव 23 गुणांनी धुव्वा उडविला. स्नेहा लामकाने (3.40 मिनिटे नाबाद संरक्षण), प्रतीक्षा बिराजदार (3.10 मि. व 6 गुण) हे त्यांच्या विजयाचे शिल्पकार ठरले. उत्तरप्रदेशच्या मानसीने (1.30 मिनिटे व 2 गुण) अष्टपैलू खेळी करीत लढत दिली.
कोल्हापूर, विदर्भही बाद फेरीत
कोल्हापूरच्या मुले व मुली आणि विदर्भच्या मुले व मुलींच्या संघानेही बाद फेरी गाठली आहे. मुलीमध्ये कोल्हापूर विरुद्ध विदर्भ आणि मुलांमध्ये कोल्हापूर विरुद्ध महाराष्ट्र आणि विदर्भ विरुद्ध ओडीसा असे बाद फेरीचे सामने होतील.