सोलापुरात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध; पोस्टरला जोडे मारून आंदोलन

सोलापूर – भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा सोलापुरात तीव्र निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी शहरात पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारून संताप व्यक्त केला.
जयंत पाटील यांच्यावर एकेरी भाषेत केलेल्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवत पोस्टरवर जोडे मारो आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.
स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितले की, “नेत्यांविषयी बोलताना काही मर्यादा पाळल्या पाहिजेत. सार्वजनिक जीवनात असताना जबाबदारीने आणि संयमाने भाषा वापरावी. एका ज्येष्ठ नेत्याविषयी अशा प्रकारची अपमानास्पद भाषा वापरणे लोकशाहीस शोभणारे नाही.”
यावेळी आंदोलनात अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी चेतावणी दिली की अशा वक्तव्यांची पुनरावृत्ती झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल.
सोलापूरात झालेले हे “जोडे मारो आंदोलन” संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे…



