गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी २.५ किमी फुलांची सजावट तर ५ हजार भाविकांना महाप्रसाद रांगोळ्यांच्या पायघड्या, भजनी दिंड्यांनी वातावरण झाले भक्तिमय…

आषाढी एकादशी निमित्त गजानन महाराजांच्या पालखीचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रियदर्शन साठे यांच्या वतीने युवा सेनेच्या वतीने जगदंबा चौक ते उपलप मंगल कार्यालय येथे २.५ किमी फुलांची सजावट तर ५ हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
सोलापुरात गजानन महाराज पालखी आगमनानंतर शहरात भक्तिभावाचा झंकार अनुभवायला मिळाला. जगदंबा चौक ते उपलप मंगल कार्यालय येथे पालखी सोहळ्याला हजारोंच्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली होती.
या भव्य सोहळ्याचे आयोजन युवासेने च्या वतीने करण्यात आले होते. पहाटेपासूनच कार्यक्रमाच्या तयारीला सुरुवात झाली होती. संपूर्ण मार्ग फुलांनी, भगव्या व निळ्या पताका – झेंड्यांनी सजवण्यात आला होता. वातावरणात “गण गण गणात बोते” चा जयघोष, टाळ – मृदंगाचा निनाद, भजनांचा गजर घुमत होता.
कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला. पारंपरिक झिम्मा आणि फुगडी खेळत पालखीला वंदन केले. तसेच, शिस्तबद्ध दिंडीने संपूर्ण मार्ग भक्तिरसात न्हावून निघाला. विविध भजनी मंडळे या सोहळ्यात सहभागी झाली होती, ज्यामुळे सारा परिसर भक्तीमय झाला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रियदर्शन साठे यांचे नेतृत्वाखाली दीपक पाटील, आशिष परदेशी, अभिजित बालप, सचिन जाधव, सचिन गुण्ठणोळ आणि रमेश शुभांगी लचके, अश्विनी मुळे यांनी महत्त्वपूर्ण परिश्रम घेतले.
चौकट
“आम्ही या सोहळ्यात केवळ एक माध्यम आहोत. माऊलींची कृपा आणि गावकऱ्यांचा सहभाग यामुळेच एवढा भव्य कार्यक्रम घडू शकला. समाजाच्या सर्व थरांतून मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायक आहे. आम्ही हे आयोजन दरवर्षी आणखी भक्तिभावाने आणि सेवाभावाने करू.”
-प्रियदर्शन साठे (मुख्य आयोजक)