Rottweilers कुत्र्याने मालकाला रस्त्यावर लोळवलं, परदेशात बंदी पण भारतात का नाही?

मुंबई : ज्यांना कुत्र्यांची आवड असेल, त्यांना रॉटवेलर या जातीचे कुत्रे नक्कीच माहिती असतील. कुत्र्यांची ही जात आक्रमकतेसाठी खूप कुप्रसिद्ध आहे. यामुळे इक्वेडोर, फ्रान्स, इस्रायल, इटली, पोर्तुगाल, रोमानिया, रशिया, स्पेन, युक्रेनसह अमेरिकेतल्या अनेक राज्यांमध्ये रॉटवेलर्स पाळण्यावर बंदी आहे.
भारतात मात्र या जातीच्या संगोपनावर बंदी नाही. भंडाऱ्यामध्ये गुरुवारी एका शेतकऱ्यावर रॉटवेलर कुत्र्यांनी भयंकर हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.
चेन्नईमध्ये केनेल रॉटवेलर्स नावाची एक संस्था आहे. या संस्थेतले मनोज पूवन्नियिल म्हणतात, “प्रत्येक कुत्रा आणि जात वेगळी असते. कुत्र्यांना घरी नेण्यापूर्वी मालकांनी त्यांची सर्व माहिती जाणून घेतली पाहिजे. ते पाळीव प्राणी कशासाठी घरी नेत आहेत, हे सर्वांत अगोदर जाणून घेतलं पाहिजे. त्यांना या प्राण्याच्या रूपात एक सहकारी पाहिजे, मित्र पाहिजे की रक्षक पाहिजे, हे निश्चित केलं पाहिजे. प्रत्येक कुत्र्याचा स्वभाव वेगळा असतो. त्यांचा राग व्यक्त करण्याचा मार्गही वेगळा असतो.” ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
रॉटवेलर्सना प्रशिक्षण देणं अतिशय गरजेचं असल्याचे मनोज सांगतात. ते म्हणाले, “तुम्ही घराच्या संरक्षणासाठी रॉटवेलर पाळला; पण तुम्ही त्याला सर्वांसोबत मिसळण्याची सवय लावली तर तुमचा उद्देश साध्य होणार नाही. त्यांना लहान वयातच असं प्रशिक्षित केलं पाहिजे, की ते तुमची आज्ञा पाळतील. कुत्र्यांची ही जात अत्यंत हुशार असते. त्यामुळे त्यांना सहज प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं. काही वेळा रॉटवेलर्स लॅब्राडॉरसारखे शांत असतात. कोणत्याही प्रकारच्या कुत्र्याला सेटल होण्यासाठी स्वतःचा वेळ हवा असतो. तुम्ही त्यांच्याशी अत्यंत संयमाने वागलं पाहिजे. तुम्ही त्यांना जे शिकवाल ते शिकण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. रॉटवेलर हा तुमच्या मुलाचा चांगला मित्र किंवा चांगला रक्षक असू शकतो. तुम्ही त्याला काय शिकवता यावर त्याचं वर्तन अवलंबून असतं.”
मनोज यांचा सहकारी नलिन त्यांच्याशी सहमत आहे. तो म्हणतो, “जेव्हा रॉटवेलर्स वयाचे चार महिने पूर्ण करतात तेव्हा त्यांना प्रशिक्षण सुरू केलं पाहिजे. त्यांना प्रशिक्षण देण्याची ही सर्वोत्तम वेळ असते. जेव्हा जेव्हा ते थोडे आक्रमक होतात तेव्हा त्यांना थकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माझ्या घरी एक नियंत्रित वातावरण आहे. त्यामुळे मी त्यांना मोकळं सोडतो. ते इकडे तिकडे धावतात आणि थोड्या वेळाने थकतात. तुमच्याकडे अशी सुविधा नसेल तर त्यांना लांब फिरायला घेऊन जा आणि त्यांना थकवा.”
अॅनिमल अॅक्टिव्हिस्ट आणि ह्युमन अॅनिमल सोसायटीच्या संस्थापक मिनी वासुदेवन म्हणतात, “रॉटवेलर्सचा वापर मूलत: बाजारात गाड्या ओढण्यासाठी, जनावरांचे कळप, घर आणि शेताचं रक्षण करण्यासाठी केला जात असे. त्यांचा उपयोग कामकरी कुत्रे म्हणून केला जात असे. अनेकांना या कुत्र्यांचा गडद रंग आणि दणकट शरीरयष्टी भयानक वाटू शकते; पण माझ्या मते रॉटवेलर्स ही एक अशी जात आहे जिच्याबाबत लोकांच्या मनात तीव्र गैरसमज आहे. हे कुत्रे कुटुंबाशी अत्यंत निष्ठावान असू शकतात.”
कोइमतूर शहर पोलिसांच्या डॉग स्क्वाडमध्ये 20 वर्षांचा अनुभव असलेले सौंदर्यराजन याबाबत म्हणाले, की कुत्र्यांची ही जात स्वभावाने थोडी आक्रमक आहे. त्यांना क्रूर समजलं जातं. त्यामुळे अनेक देशांमध्ये त्यांच्यावर बंदी आहे. हे शक्तिशाली जबडे असलेले आक्रमक प्राणी आहेत. ते त्यांच्या पकडीतून सहज कोणाला सोडत नाहीत. सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी त्यांना लहानपणापासूनच प्रशिक्षित करणं गरजेचं आहे.
जानेवारी 2021मध्ये कुडलूर जिल्ह्यातल्या एका शेतात दोन पाळीव रॉटवेलर्सनी 58 वर्षीय गड्याचा जीव घेतला होता. 2019मध्ये चेन्नईतल्या अवाडीमध्ये दोन पाळीव रॉटवेलर्सच्या हल्ल्यात 68 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत भारतात अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे कुत्र्यांची रॉटवेलर ही जात पाळण्यास योग्य आहे की नाही, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.



