उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे राजकारणात उतरणार; नाशिकमध्ये पहिला मेळावा घेणार
पती उद्धव ठाकरेंना बळ देण्यासाठी कार्यकर्त्यांच्या वहिणी रश्मी ठाकरे स्वतः सक्रिय राजकारणात उतरणार असल्याचे समजते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात त्या नाशिकमध्ये महिला मेळावा घेणार आहेत. ठाकरे गटाने या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
एकनाथ शिंदे यांचे बंड. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या हातून गेलेली सत्ता. या घडामोडींनी महाराष्ट्र हादरला. या आणीबाणीच्या परिस्थितीत रश्मी ठाकरे मैदानात उतरल्या. ठाण्यामधील महिलांचा मेळावा असो किंवा महाविकास आघाडीचा निघालेला मोर्चा रश्मी ठाकरे सक्रिय झाल्याचे दिसून आल्या. आता त्या मुंबईबाहेर सक्रिय होताना दिसत आहेत.
पक्षबांधणीची तयारी
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रात दौरे करत आहेत. शिवसेना हे नाव आणि चिन्ह हातातून गेल्यानंतर पक्षबांधणीसाठी ठाकरेंकडून जोरदार तयारी केली जात आहे. गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या नावाची ब्रँडिंग सुरू करण्यात आली होती. तेजस ठाकरे मैदानात उतरणार असे बोलले जात होते. मात्र, आता तेजसऐवजी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे राजकारणात सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे.
पहिला राजकीय दौरा
नाशिकमध्ये आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात रश्मी ठाकरे या जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे बोलले जात आहे. याआधी रश्मी ठाकरे यांनी मुंबईतील अनेक कार्यक्रमांना हजेरी लावलेली आहे. रश्मी ठाकरे या अनेक राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. मात्र, त्या कधी थेट सक्रिय राजकारणात उतरलेल्या दिसल्या नाहीत. रश्मी ठाकरेंचा हा पहिला राजकीय दौरा असणार आहे.
कशी झाली ठाकरेंची भेट?
रश्मी ठाकरे यांचा जन्म डोंबिवलीत एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झाला. लग्नाआधीचे त्यांचे आडनाव पाटणकर आहे. रश्मी ठाकरे 1987 साली एलआयसीमध्ये नोकरीवर रुजू झाल्या. कंत्राटी स्वरुपाची ही नोकरी होती. एलआयसीमध्ये नोकरी करत असताना त्यांची जयवंती ठाकरे यांच्याबरोबर मैत्री झाली. जयवंती या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची बहीण आहेत. जयवंती यांनी रश्मी आणि उद्धव ठाकरे यांची भेट घडवून आणली होती. त्यानंतर ते विवाहबंधनात अडकले.