कट्टर हिंदुत्ववादी गोरंटला यांना शहर मध्यची उमेदवारी द्यावी; श्री मार्कंडेय जनजागृती संघाची मागणी…
सोलापुरात सुमारे चार लाख लोकसंख्या असलेला तेलुगु भाषिक हिंदू पद्मशाली समाज हा कट्टर हिंदुत्ववादी आणि धर्मनिष्ठ आहे. हा समाज नेहमी राष्ट्रीयत्वाची भूमिका मांडणाऱ्या भारतीय जनता पक्षासोबत एकनिष्ठ आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेंव्हा सोलापुरातील रे-नगरच्या उद्घाटनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी समाजाचे मनभरून कौतुक केले. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळीही त्यांनी समाजाबद्दल गौरवोदगार काढले. तेलुगु भाषिक हिंदू पद्मशाली समाज हा राष्ट्राच्या व समाजाच्या उन्नतीसाठी नेहमीच पुढे असतो. अशा समाजाला शहर मध्य मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अशा मागणीचे निवेदन श्री मार्कंडेय जनजागृती संघाच्या वतीने
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी व शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना दिले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून कडवट आणि धर्मनिष्ठ असलेला तेलुगु भाषिक हिंदू पद्मशाली समाज हा भारतीय जनता पक्षासोबत उभा आहे. परंतु भारतीय जनता पक्षाने समाजासाठी हवे तेवढे योगदान दिलेले नाही. समाजाला गृहीत धरून नेहमीच दुर्लक्षित केले आहे. याची खदखद सोलापूर शहर उत्तर, शहर मध्य व शहर दक्षिण अशा तीनही मतदारसंघातील तेलुगु भाषिक हिंदू पद्मशाली मतदारांमध्ये आहे.
यंदाच्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर ‘शहर मध्य’ मतदार संघाची उमेदवारी भारतीय जनता पक्षाने तेलुगु भाषिक हिंदू पद्मशाली समाजाला द्यावी. ही उमेदवारी देत असताना उमेदवारीसाठी पक्षांतर न केलेला व स्वच्छ प्रतिमा असलेला कट्टर हिंदुत्ववादी उमेदवार असावा. यासाठी गेल्या वीस वर्षांपासून बजरंग दल विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज व संघ परिवाराच्या माध्यमातून देव, देश, धर्म कार्यासाठी अहोरात्र झटत असलेले अंबादास गोरंटला ही योग्य व्यक्ती आहेत. त्यांनी समाजातील लव्ह जिहाद, धर्मांतरण, लँड जिहाद रोखण्यासाठी जीवाचे रान केले आहे. कधीही राजकीय इच्छा आकांक्षा न बाळगता नेहमी हिंदू समाजाच्या हिताकरिता काम केले आहे. आज गरज म्हणून यंदाच्या विधानसभेला अंबादास गोरंटला यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी संघाने केली आहे.
भारतीय जनता पक्षाने समाजाची भावना समजून घेऊन बाहेरचा व पक्षांतर केलेला उमेदवार देण्याचे टाळावे. याबाबत भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सकारात्मक विचार करून तेलुगु भाषिक हिंदू पद्मशाली समाजाला शहर मध्य मतदारसंघाची उमेदवारी द्यावी अशी मागणी श्री मार्कंडेय जनजागृती संघाने निवेदनाद्वारे केली आहे.
याप्रसंगी श्री मार्कंडेय जनजागृती संघाचे देविदास चिन्नी, श्रीनिवास रच्चा, रमेश गाली, देविदास इट्टम, नितीन मार्गम, पुंडलिक गाजंगी, विजय इप्पाकायल, बालराज बिंगी, किशोर व्यंकटगिरी, अंबादास वग्गू, तिरूपती वग्गा, जनार्दन पिस्के, किसन दावत, श्रीनिवास गाली व वेणू कोडम आदी पदाधिकारी उपस्थित होते.