गाडीचा पाठलाग करून पुण्यात 5 कोटींचे ड्रग्ज जप्त
कुरिअर बॉइजच्या गाडीचा सातारा ते लोणावळा पाठलाग करून पुणे अबकारी विभागाच्या पथकाने एक किलो मेथाम्फेटामाइन हा अमली पदार्थ जप्त केला. बाजारात त्याचे मूल्य पाच कोटी रुपये अाहे. याप्रकरणी चार तस्करांना अटक करण्यात आली.
अबकारी विभागाच्या अमली पदार्थ प्रतिबंधक पथकास २९ मे रोजी सातारा येथून मुंबईला मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी नेणार असल्याची टिप मिळाली होती. त्यानुसार अबकारीच्या एका पथकाने बनावट ग्राहक बनून तस्करांशी संपर्क साधला व अमली पदार्थ हवे असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मेथाम्फेटामाइनचे पुडके घेऊन दोन तरुण काळ्या रंगाच्या गाडीत निघाले. अबकारीच्या एका पथकाने सातारा येथून सायंकाळी ६ वाजता काळ्या रंगाच्या एसयूव्हीचा पाठलाग सुरू केला. दोन तास पाठलाग केल्यानंतर रात्री ८ वाजेच्या सुमारास गाडी खेड शिवापूर टाेलनाक्यावर थांबताच तिथे दुसऱ्या पथकाने गाडीला घेरले.
त्या वेळी गाडीत दोन जण होते. त्यांची अर्धा तास कसून चौकशी केली. त्यानंतर गाडीची झडती घेतली असता त्यात ८५० ग्रॅम मेथाम्फेटामाइनचे पुडके सापडले. तरुणांच्या चाैकशीत आणखी दोन साथीदार मंुबईहून अमली पदार्थ घेऊन त्यांना लोणावळ्यात भेटणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अबकारी पथकाने गाडी लोणावळ्याकडे नेली. मुंबईहून दोन तरुण मोटारसायकलवर आले. त्या ठिकाणी दोन साथीदार त्यांची वाट पाहत होते. अबकारी पथकाने त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून आणखी २०० ग्रॅम मेथाम्फेटामाइन जप्त केले. दरम्यान, चारही आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने १३ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पुण्यातही २६ लाखांचे अमली पदार्थ जप्त
अबकारीपाठोपाठ पुणे पोलिसांनीही बुधवारी मेफेड्रोन आणि बंटा असे एकूण ६१० किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त केले. त्याची बाजातील मूल्य २६ लाख ३० हजार रुपये आहे. याप्रकरणी जितेंद्र सतीशकुमार दुअा (४०, रा.उरुळी-कांचन,मूळ निवासी तिलकनगर पश्चिम दिल्ली) या तरुणास ताब्यात घेतले अाहे.त्याच्याकडून अमली पदार्थासह एकूण ३६ लाख ४७ हजारांचा एेवज जप्त केला.