पोरी, तुझा संघर्ष वाया जाणार नाही !

ऑलिंपिक स्पर्धेत तुला अपात्र ठरविले गेले असले तरी कोट्यावधी भारतीयांच्या नजरेत आज तू खऱ्या अर्थाने पात्र ठरली आहेस.तू जिंकूनही तुला पराभूत घोषित केले असले तरी आमच्या नजरेत तू विजयी झाली आहेस.संघर्षाचे अनेक पर्वत पार करीत,विकृतांच्या टीकेच्या बाणांनी रक्तबंबाळ झालेली असतानाही तू जगातील नंबर 1 च्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करून ऑलिंपिकच्या फायनल मध्ये पोहोचली; यातच तुझ्या संघर्षमय जीवनाचे रहस्य दडलेले आहे.तू संघर्षयोद्धा आहेस ! रणरागिणी आहेस ! अन्यायग्रस्तांसाठी संजीवनी आहेस ! रस्त्यावरची आणि मैदानावरची या दोन्ही लढाया तू ज्या धैर्याने लढली; त्यावरून तुझ्यातील खऱ्या योद्धयाचे दर्शन होते.सत्तेच्या अजस्त्र शस्त्रांनी तुला घायाळ करण्याचा पुरेपूर कुप्रयत्न आणि नालायकपणा केला असला तरी तू सर्वस्व पणाला लावून बलाढ्य शत्रूला मैदानाप्रमाणेच रस्त्यावरही जी टक्कर दिली, ती हा देश कधीच विसरू शकणार नाही.सत्तेच्या गुलामांनी तुझ्यावर जी जहरी टीका केली ती कोणत्याही सभ्य माणसाला सहन होऊ शकत नाही.पण काही लोकांनी लाचारी मध्ये माणुसकीच्या सगळ्या मर्यादा पार केलेल्या असल्यामुळे त्यांना देशापेक्षा व्यक्ति मोठा वाटायला लागतो.
पोरी, एकीकडे देशाच्या संसदेचे उद्घाटन होत असताना, तुला आणि तुझ्या सहकाऱ्यांना जेव्हा दिल्लीच्या सडकेवर शेकडो पोलीस ओढत,घासत नेत होते ते दृश्य या देशातील संवेदनशील माणूस कधीही विसरू शकणार नाही.तुला मिळालेले सर्व सन्मान, पुरस्कार तू परत करायला गेलेली असतानाही या देशाच्या सत्ताधाऱ्यांच्या हृदयाला जराही पाझर फुटू नये यातच त्यांची मुजोरी आणि मस्ती दिसून येते.कालही संसदेत तुझ्यावर किती पैसे खर्च केले हे जेव्हा पुन्हा पुन्हा सांगितले जात होते, तेव्हा ही मंडळी किती निर्लज्ज आणि संवेदनाहीन आहे याची प्रचिती आली.आज तुझा सर्वत्र जयजयकार, उदो उदो सुरू आहे.पण ज्यावेळी देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा एक खासदार तुझ्या चारित्र्याचे धिंडोळे काढत होता; त्यावेळी मात्र तुझ्या बाजूने उभे राहायला इथला गुलाम गोदी मीडिया तयार नव्हता.या देशातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा इतिहासात कधीच झाला नसेल एवढा घोर अपमान तुला आणि तुझ्या सहकाऱ्यांना सहन करावा लागला.हा अपमान तू उभरत्या खेळाडूंच्या उज्वल भविष्यासाठी सहन केला.यात तुझा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नव्हता.परंतु हुकूमशाही प्रवृत्तीचे लोक संवेदना गमावून बसलेले असतात.त्यामुळे त्यांना स्त्रियांच्या सन्मानाशी काही घेणे देणे नसते.
विनेश,तुला अपात्र ठरविल्याने विकृतांना कितीही अघोरी आनंद झाला असला तरी तुझे नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.तुझ्यासारख्या पराक्रमी आणि शूर मुलीसमोर नजरेला नजर भिडवताना येथील हुकूमशाही प्रवृत्तीची आता मात्र हिम्मत होणार नाही.म्हणूनच तुझ्या अपात्र होण्याचा काही जणांना असूरी आनंद झाला आहे.तू रस्त्यावरही देशासाठी लढली आणि मैदानावर सुद्धा ! असे सत्ताधारी किती येतील आणि जातील ! पण येणाऱ्या कित्येक पिढ्या तुझा रस्त्यावरील आणि मैदानावरील संघर्ष आपल्या काळजाच्या आत जपून ठेवेल.कारण इतक्या बलाढ्य सत्तेशी रस्त्यावर उतरून टक्कर देणारी एखादीच विनेश फोगाट शेकडो वर्षात जन्माला येत असते.जगातल्या अव्वल कुस्तीपटूंना पराभूत केल्यानंतरही तुला दुःखी अंत:करणाने संन्यासाची घोषणा करावी लागली.त्यामुळे देशाला फार मोठा धक्का बसला.पोरी, तुझा संघर्ष अजिबातही वाया जाणार नाही.तुझ्या दुर्दम्य साहस आणि संघर्षातून असंख्य विनेश निर्माण होतील आणि येथील रगेल आणि रंगेल व्यवस्थेच्या छाताडावर नाचून ही व्यवस्थाच पूर्णतः उलथून टाकतील आणि देशाला महासत्ता बनवतील.पोरी, तू खऱ्या अर्थाने जिजाऊ,सावित्री,अहिल्या,रमाईची लेक शोभून दिसते.तुझ्या शौर्याला, धैर्याला,संघर्षाला आणि निडरतेला मनापासून सलाम !
Heartiest Salute Vinesh !!!
प्रेमकुमार बोके
अंजनगाव सुर्जी