नई जिंदगी परिसरातील शोभादेवी नगरात बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला

सोलापूर : दिनांक: २६ सप्टेंबर २०२५
याबाबत अधिक माहिती अशी की,नई जिंदगी परिसरातील शोभादेवी नगर येथे आज २५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळच्या वेळेस एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मोहसीन मुनाफ शेख (वय ३८, रा. लक्ष्मी नगर, बिलाल मशीदजवळ) असे मृत व्यक्तीचे नाव असून, तो गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहसीन शेख हा २२ सप्टेंबरपासून घरातून निघून गेला होता. दिनांक २३ सप्टेंबर रोजी त्याचे घरातील व्यक्तींशी शेवटचे फोनवर बोलणे झाले. त्यानंतर त्याचा फोन स्विच ऑफ झाला आणि तो बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण आज सायंकाळी शोभादेवी नगर येथील एका मंदिरासमोर मोहसीन शेख यांचा मृतदेह आढळून आला. नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख पटवली. पोलिसांनी शव ताब्यात घेत पोस्टमॉर्टेमसाठी सिविल हॉस्पिटल येथे पाठवले असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत.



