निकृष्ट रस्ता दुरुस्तीविरोधात निलेश संगेपाग यांचा अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू…
प्रभाग १५ आणि शहरामधील नागरिकांचा प्रचंड वाढता पाठिंबा...

प्रभाग क्र. १५ मधील कोणापुरे चाळ परिसरात पाईपलाईन कामानंतर करण्यात आलेल्या कथित निकृष्ट रस्ता दुरुस्तीविरोधात सुरू असलेले निलेश श्रीनिवास संगेपाग यांचे अन्नत्याग आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू राहिले. प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सदर परिसरात पाईपलाईन काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करताना संपूर्ण रुंदीमध्ये “Like to Like” पद्धतीने डांबरीकरण न करता अत्यल्प जाडीचे नियमबाह्य अर्धा ते एक इंच काँक्रीट टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी रस्त्यावर धूळ उडणे, खड्डे निर्माण होणे व वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहे.
या संदर्भात संगेपाग यांनी यापूर्वी महानगरपालिका प्रशासनाकडे नागरिकांच्या पाठिंब्यासह लेखी निवेदने देऊन संबंधित कंत्राटदारावर व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व दर्जेदार डांबरीकरणाची मागणी केली होती. मात्र समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी १२ फेब्रुवारीपासून शांततामय अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केली आहे.
आंदोलनाच्या पहिल्या दिवशी पासून परिसरातील शेकडो नागरिकांनी आंदोलन स्थळी भेट देत लेखी पाठिंबा नोंदविला. “हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण परिसराच्या सुरक्षिततेचा आहे,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने जबाबदार व्यक्तींवर आणि अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा निलेश संगेपाग यांनी दिला आहे.
आंदोलन स्थळी श्रीकांत वाघमारे, जुबेर हिरापुरे, मल्लिकार्जुन पिलगेरी, आकाश गायकवाड, सुचित्रा वाघमारे, यांच्यासह अनेक जन सोबत उपस्थित राहत आहेत.



