निवृत्त आयपीएस अधिकारी अतुलचंद्र कुलकर्णी यांची मॅटच्या सदस्यपदी निवड…
सोलापूरच्या सुपुत्राचा सन्मान
पोलिस खात्यातील सेवेत आपल्या विशेष सेवेतून नावलौकीक मिळविलेल्या अतुलचंद्र कुलकर्णी यांची महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅटच्या) सदस्यपदी (प्रशासकीय) नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची मुदत चार वर्षे राहणार आहे.
निवृत्त आयपीएस अधिकारी कुलकर्णी हे मूळचे अरण (जि. सोलापूर) येथील रहिवासी आहेत. श्री. कुलकर्णी हे 1990 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यात पोलिस अधिकारी पदावर काम केले. दहशतवाद विरोधी पथकात असताना त्यांनी 128 तरुणांचे मन पालटवून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. सीआयडीचे अपर महासंचालक असताना पालघर येथील साधूंच्या हत्याकांडाच्या लावलेल्या तपासाबाबत त्यांचा गौरव करण्यात आला होता. कोसोवो येथील शांतीसेना, मुंबईवरील हल्ल्यातील आरोपी कसाबचा तपास, मुंबई क्राईम ब्रँच, आयबी, तुरुंग विभागाचे महानिरीक्षक म्हणून तसेच केंद्रीय तपास यंत्रणेत (एन आय ए) विशेष महासंचालक म्हणून त्यांचे योगदान मोठे आहे.
आतापर्यंत त्यांना राष्ट्रपती पदक, महासंचालकांचे विशेष पदक अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.