माझ्या 5 महिन्यांच्या बाळाला धुळीत कसे ठेवू?:आमदार सरोज अहिरेंचा सरकारला सवाल; हिरकणी कक्षातले हाल सांगताना कोसळले रडू
आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. शिंदे-फडणवीस सरकारचे हा पहिला अर्थसंकल्प आहे. मात्र, नाशिकच्या आमदार सरोज अहिरे या हिरकणी कक्षाची अतिशय वाईट अवस्था पाहून भावुक झाल्या. माझ्या 5 महिन्यांच्या बाळाची तब्येत बरी नाही याठिकाणी धुळीत मी माझ्या बाळाला कसे ठेवावे? हा प्रश्न विचारताना त्यांना रडू आवरले नाही.
सरोज अहिरे म्हणाल्या, माझ्या देवळाली मतदारसंघासाठी न्याय मागायला मी याठिकाणी आले. नागपुरलाही मी माझ्या बाळासहीत गेले होते. तो माझ्याशिवाय राहू शकत नाही, तो केवळ 5 महिन्यांचा आहे. मागच्या महिन्यात प्रधान सचिवांना मी पत्र लिहिले होते. हिरकणी कक्षाची मागणी केली होती. मला एक कक्ष देण्यात आले. मात्र याठिकाणी कुठल्याही सोयीसुविधा नाहीत. धूळ आहे, पाळणा नाही, सोफ्याचे कव्हर फाटलेले आहेत. माझ्या बाळाची तब्येत गेल्या 3 दिवसांपासून खराब आहे. अशाठिकाणी मी त्याला कसे ठेवू? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
याचे दुःख होत आहे
सरोज अहिरे म्हणाल्या, आजचे राज्यपालांचे अभिभाषण मला ऐकता आले नाही. याचे मला अतिशय दुःख होत आहे. हे सरकार फक्त शिंदेंचे आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही. जर यात आज बदल केले नाहीत तर मला पुन्हा मतदारसंघात जावे लागेल. माझ्या जनतेच्या प्रश्नांसाठी मला काहीही करता येणार नाही. आज विधानभवनातील लहान बाळांसाठी करण्यात आलेल्या विशेष कक्षाची अवस्था पाहून त्यांनी काढता पाय घेतला.
घोषणा हवेतच विरली
सरोज अहिरे या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही आपल्या बाळासह आल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण राज्यासह देशभरात त्यांची चर्चा झाली. त्यावेळी अनेकांनी त्यांचे कौतुक केले होते. याच दरम्यान सरोज अहिरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटून कौतुक केले होते. आणि हिरकणी कक्ष सुरू करत असल्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा हवेतच विरल्याचे आज दिसून आले.
कोण आहेत सरोज अहिरे?
सरोज अहिरे या नाशिकच्या देवळालीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आहेत. नाशिक मधील दंतरोगतज्ञ डॉ. प्रवीण वाघ यांच्याशी फेब्रुवारी 2021 ला त्यांचा विवाह झाला. 30 सप्टेंबरला त्यांच्या बाळाचा जन्म झाला. प्रशंसक प्रवीण वाघ असे बाळाचे नाव आहे.