लग्नाचे आमिष दाखवून दुष्कर्म केल्या प्रकरणी एकास अटकपूर्व जामीन मंजूर..
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी मैनुद्दीन मुल्ला (रा. साईनाथ नगर मजरेवाडी सोलापूर ) यास मे. जिल्हा व सत्र न्यायालयाने सोलापूर येथून सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणात पिडीता व आरोपी हे पोलीस भरती तयारीसाठी सोलापूर येथील एका अकॅडमी येथे होते. तदनंतर आरोपी व फिर्यादी यांच्यात मैत्री संबंध निर्माण झाले त्यातूनच त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. आरोपीने फिर्यादीस मला तुझ्याशी लग्न करायचे आहे ,असे म्हणून फिर्यादीचा विश्वास संपादन केला होता. तसेच आरोपीने फिर्यादीला अनेक ठिकाणी घेऊन जाऊन तिच्यावर अनेक वेळा अत्याचार देखील केले असल्याची फिर्याद सोलापूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे क्रमांक -२४२/२०२४ अन्वये भादवी कलम ३७६,३७६(२)(n),५०६ अंतर्गत दाखल करण्यात आली होती. फिर्यादीस पुणे येथे खाजगी नोकरी लागली असताना तेथे देखील जाऊन आरोपीने तिच्यासोबत अत्याचार केले होते. आरोपीने पळून जाऊन लग्न करू असे म्हणून फिर्यादीस फसवले व तसेच विश्वास संपादन केल्याने त्यास बळी पडून यातील फिर्यादीने दोघांच्या लग्नाचा अट्टहास केला होता व त्यानंतर आरोपीने मी आता लग्न करू शकत नाही असे म्हणून धमकीही फिर्यादीस दिली होती. परंतु वारंवार विचारून सुद्धा आरोपीने लग्न न केल्यामुळे फिर्यादीने आरोपी विरुद्ध सदरचा गुन्हा दाखल केला होता .आरोपींनी आपला अटकपूर्व जामीन अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता .या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री केंद्रे यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. यात आरोपी तर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड. निलेश कट्टीमनी,ॲड. वैभव बोंगे यांनी काम पाहिले.