महाराष्ट्र

शंकराचार्य अयोध्येला जाण्यासाठी तयार, मात्र समोर ठेवली मोठी अट; म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी..’

Shankaracharya – ज्योतिष पीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती अयोध्येतील राम मंदिरात जाण्यासाठी तयार झाले आहेत. तथापि, त्यांनी यासाठी एक अट ठेवली आहे. ते म्हणाले की प्रभू रामाला आणणाऱ्या गोमातेची आज हत्या केली जाते आहे.

हे प्रकार रोखता आलेले नाही हे दुर्दैव आहे. अशा स्थितीत आम्ही कोणत्या तोंडाने प्रभू रामाला सामोरे जायचे असे त्यांनी म्हटले आहे.

एका यू ट्यूब चॅनलशी बोलतना अविमुक्तेश्‍वरानंद म्हणाले की, विधी- विधानासह शिखर तयार झाल्यावर रामललाची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर आपण अयोध्येला नक्की जाऊ. सर्व कार्यक्रमांत सहभागी होऊ, मात्र प्रभू रामाच्या समक्ष जाणार नाही. जेंव्हा गोहत्येचे प्रकार थांबतील तेंव्हाच आपण तेथे जाऊ.

जर २२ जानेवारी २०२४ रोजीच कार्यक्रम घेण्याचा त्यांचा हट्ट असेल तर तोपर्यंत किमान गोहत्या बंदीची घोषणा तरी केली जावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर असे केले तर आम्ही इश्‍वराला सांगू की जी काही त्रुटी राहीली आहे त्याची या ऐवजापोटी कृपा करावी. गोहत्या बंदीचे फार मोठे काम त्यामुळे होऊन जाईल.

मोदींच्या विरोधात नाही…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आमचे शत्रुत्व असण्याचे कारणच काय असा सवाल विचारताना अविमुक्तेश्‍वरानंद सरस्वती म्हणाले की, त्यांच्याकडे (टीका करणाऱ्यांकडे ) कोणतेही उत्तर नसल्यामुळे किंवा आम्ही उपस्थित केलेले मुद्दे खोडून काढता येत नसल्यामुळे आम्ही मोदी विरोधी आहोत अशा गोष्टी बोलल्या जात आहेत. मोदी धाडसी आहेत आणि आम्हाला अशा व्यक्ती आवडतात.

तथापि, अयोध्येत त्यांच्या हातून चुकीचे काम करवून घेतले जाते आहे. त्यांच्याकडून काही चुकीचे काम व्हावे अशी आमची इच्छा नाही. वास्तविक आम्ही त्यांचे शुभचिंतक आहोत. मात्र राजकीय मंडळी कोणतेतरी लेबल लावून टाकतात. मोदी चांगले राहावेत अशीच आमची इच्छा आहे.

मंदिराचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्यामुळे प्राणप्रतिष्ठा सोहळा इतक्यात केला जाऊ नये अशी भूमिका शंकराचार्यांनी घेतली आहे. अपूर्ण मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे शास्त्रानुसार वर्ज्य आहे. मंदिर हे देवाचे शरिर असते आणि शिखर (कळस) त्याचे डोके असते. तेच अद्याप पूर्ण झालेले नाही आणि या लोकांना प्राणप्रतिष्ठेची घाई झाली आहे. हा प्रकार म्हणजे डोके नसलेल्या धडासारखे असेल आणि ते शास्त्रानुसार अयोग्य आहे असे त्यांनी नमूद केले.

काही लोकांकडून आमची तुलना लग्नात रूसून बसलेल्या फुफाशी केली जाते आहे. मात्र येथे कोणता विवाह सोहळ्याचा विषयच नाही. मोठे लोक काहीतरी आचरण करतात आणि सर्वसामान्य लोक मग त्याचे उदाहरण देत त्याप्रकारे आचरण करतात. येणाऱ्या काळात हाच पायंडा पडेल आणि नंतर सगळे लोक असेच अनुकरण करू लागतील असा खुलासा अविमुक्तेश्‍वरानंद यांनी त्यांच्यावर होत असलेल्या टीकेच्या पाश्‍र्वभूमीवर केला.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel