महाराष्ट्रसोलापूर बातमीसोलापूर राजकीय

शिवजयंती दिनी ‘मेरा युवा भारत’ मेगा पदयात्रेचे आयोजन…

पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी पदयात्रेचे काटेकोर नियोजन करून यशस्वी करावी - विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त १९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभरात ‘माय भारत’ (मेरा युवा भारत) मेगा पदयात्रा आयोजित करण्यात येणार असून पुणे विभागातील सर्व जिल्ह्यांनी त्याबाबत काटेकोर नियोजन करून उपक्रम यशस्वी करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू यांच्यासह दूरदृश्य प्रणालीद्वारे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी तसेच विभागातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले की, भारत सरकारचे युवक व क्रीडा मंत्रालय आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त या पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, शिक्षण विभाग तसेच आरोग्य विभागासह अन्य सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने तयारी करून हा उपक्रम यशस्वी करावा. विभागात सर्व जिल्ह्यात पदयात्रा आयोजित करण्यात येणार असून मुख्य कार्यक्रम सातारा येथे आयोजित करण्यात येणार आहे.

ते पुढे म्हणाले, या पदयात्रेमध्ये अधिकाधिक विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी व्हावेत यासाठी शिक्षण विभागाने शैक्षणिक संस्थांशी तात्काळ समन्वय साधून नियोजन करावे. पदयात्रेत अधिकाधिक लोकप्रतिनिधी, विविध शासकीय अधिकारी, महिला, युवक आदी सहभागी व्हावेत यासाठी प्रयत्न करावेत. राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, भारत स्काऊट आणि गाईड आदीमधील विद्यार्थ्यांना सहभागी करून घ्यावे. उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून सकाळी लवकर पदयात्रा आयोजित करावी. मार्गावर आवश्यक तेथे पाण्याची, आरोग्य तपासणी, उपचारासाठी वैद्यकीय पथके, पुरेशा रुग्णवाहिका आदींची व्यवस्था करावी. लहान मुले येणार असतील तर त्यांची विशेष काळजी घ्यावी. आजारी मुले सहभागी होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

आयोजित पदयात्रा ही केवळ औपचारिक मिरवणूक न राहता ती तरुण पिढीला महाराजांच्या विचारांशी जोडणारी, राष्ट्रप्रेम जागृत करणारी आणि स्वराज्याचा संदेश देणारी प्रेरणादायी चळवळ ठरावी, असेही डॉ. फुलकुंडवार यांनी सांगितले.

पोलीस विभागाने वाहतूक व्यवस्थापनाचा आराखडा करून योग्य ती अंमलबजावणी करावी अशा सूचना विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. फुलारी यांनी पोलीस दलाला दिल्या.

केंद्र शासनाच्या युवक कल्याण विभागामार्फत ‘MyBharat’ पोर्टलद्वारे सहभागी होण्याचे युवकांना आवाहन करण्यात आले आहे. पुणे विभागात पारंपारिक वेशभूषेत, ढोल-ताशा पथकांच्या गजरात आणि महाराजांच्या जयघोषात पदयात्रा काढण्यात येणार आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel