सोलापुरातील या खून प्रकरणात आरोपीस जन्मठेपेची शिक्षा
सोलापूर :-पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरूणाचा खून करणार्यास जिल्हा न्यायाधीश योगेश राणे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
रामहरी उर्फ राम शामराव बनसोडे (वय 34, रा. तेलगाव सिना, ता. उत्तर सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. युवराज निवृत्ती लांडगे (रा. तेलगाव सिना) असे खून झालेल्याचे नाव असून याबाबत रमेश नागनाथ लांडगे (वय 32, रा. तेलगाव सिना) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
रामहरी बनसोडे व युवराज लांडगे हे दोघे एकाच गावातील रहिवासी होते. रामहरी बनसोडे यास त्याची पत्नी व युवराज लांडगे यांचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून 8 एप्रिल 2020 रोजी रामहरी बनसोडे याने तेलगाव ते कंदलगाव जाणार्य रोडवर युवराज लांडगे याचा दगडाने व चाकूने मारून खून केला होता. याप्रकरणी रमेश लांडगे यांच्या फिर्यादीवरुन सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपी रामहरी बनसोडे यास अटक केली. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक डी एस दळवी यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले.
याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश योगेश राणे यांच्यासमोर झाली. याप्रकरणी सरकारच्यावतीने 11 साक्षीदार तपासण्यात आले. नेत्रसाक्षीदार व सरकारी वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश राणे यांनी आरोपी रामहरी बनसोडे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याप्रकरणी सरकारच्यावतीने अॅड, माधुरी देशपांडे यांनी तर आरोपीच्यावतीने अॅड. शिव झुरळे यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलिस कर्मचारी रंजना जमादार यांनी काम पाहिले.