सोलापुरातील विश्वनाथ पाटील खू-न प्रकरण ; एकास मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
विश्वनाथ बसन्ना पाटील याचा खून केल्याप्रकरणी मसन्ना धोंडीबा गायकवाड रा:- ममदापुर, ता. अक्कलकोट यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री माधव जामदार यांनी जामीन मंजूर केला.
यात हकीकत अशी की, दि 12/6/2020 रोजी विश्वनाथ बसन्ना पाटील व त्याचे तीन मित्र हे त्याचे शेतात जेवण करीत बसले होते, जेवण करून झाल्यानंतर ते सर्वजण स्विफ्ट गाडीमध्ये बसून गावात निघाले होते. गावातील मुख्य रस्त्यावरून चंद्रकांत गायकवाड यांच्या घरासमोर आले असता चंद्रकांत हा रस्त्यावर म्हशीचे दूध काढत होता, त्यास म्हैस बाजूला घेऊन दूध काढ असे म्हणाले असता तो शिवीगाळ करू लागला. त्यावेळेस विश्वनाथ पाटील व सिद्धाराम पाटील हे खाली उतरले तू आम्हाला शिवीगाळ का करतोस असे म्हणाल्यावर त्याने धोंडीबा गायकवाड, बसन्ना गायकवाड, अंबादास कोळी, लिंगप्पा कोळी, सूर्यकांत कोळी व इतर यांना बोलावून घेऊन विश्वनाथ यास मारहाण सुरू केली, त्यास कुऱ्हाडीने, तलवारीने मारून जखमी केले, तसेच सिद्धाराम व इतरांनाही मारहाण करून जखमी केले व गाडीवर दगडे टाकून गाडीचे नुकसान केले. उपचारादरम्यान विश्वनाथ हा मयत झाला, अशा आशयाची फिर्याद मयताचा चुलत भाऊ सिद्धाराम हनुमंत पाटील याने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली होती.
त्यावर आपणास जामीन मिळावा म्हणून मसन्ना याने जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे जामीन अर्ज दाखल केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता.
त्यावर मसन्ना याने एडवोकेट रितेश थोबडे यांचेमार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.
अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस अर्जदार आरोपीचे वकील ॲड रितेश थोबडे यांनी आपले युक्तिवादात फिर्यादीचे अवलोकन केले असता अर्जदार आरोपी याने मयतास तलवारीने पाठीवर मारहाण केली आहे, परंतु शवविच्छेदनाचा अहवाल पाहता त्यामध्ये मयत हा डोक्यास जखम झाल्याने मयत झाला असल्याचे नमूद असल्याने अर्जदार आरोपीच्या मारहाणीने विश्वनाथ पाटील हा मयत झाला असे म्हणता येणार नसल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायमूर्तींनी 25000/- रुपयांच्या जातमुचलक्यावर अर्जदार आरोपीस जामीन मंजूर केला.
यात अर्जदार आरोपीतर्फे ऍड रितेश थोबडे तर सरकारतर्फे ऍड सविता यादव यांनी काम पाहिले.