सोलापुरातून प्रणिती शिंदे तर माढा मधून धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर..
सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. पहिल्या फेरीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे या पाच हजार २३८ मतांनी आघाडीवर होत. दुसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीच्या उमेदवार शिंदे या महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्यापेक्षा २१ हजार मतांनी आघाडीवर होत.
माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यात लढत होत आहे. पहिल्या फेरीमध्ये मोहिते-पाटील यांनी आघाडी सुमारे सात हजार मतांनी आघाडी घेतली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी १२ लाख मतदारांनी मतदान केले होते. तेवढेच मतदान माढा लोकसभा मतदारसंघासाठीही झाले होते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघातून कोण विजयी होणार याकडे राज्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत, अशा पंढरपूर-मंगळवेढा, सोलापूर दक्षिण, मोहोळ, अक्कलकोट या मतदारसंघातून आ. शिंदे यांना आघाडी मिळाली आहे त्याचबरोबर माढा मतदारसंघातून मोहिते-पाटील यांनी फलटण- माण या नाईक-निंबाळकरांच्या बालेकिल्यातही आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.
या दोन्ही मतदारसंघात अतिशय चुरशीच्या लढती होतील असे बोलले जात होते. सध्या आलेल्या कलानुसारही तशीच स्थिती असल्याचे समार येत आहे.
तिसऱ्या फेरीअखेर सोलापूर लोकसभा मतदारसंघात महाआघाडीच्या उमेदवार शिंदे यांना १० हजार ४७६ मतांची आघाडी मिळाली आहे. शेवटी विजयाचा गुलाला कोण उधळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.