सोलापुरात तहसीलदारालाच जीवे मारण्याची धमकी, शिवीगाळ करून निवडणूक कागदपत्रे फाडली ; गुन्हा दाखल!

सोलापूर : सोलापूरच्या शासकीय यंत्रणेला हादरवून टाकणारी अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली आहे. शासकीय रकमेचा अपहार करून बनावट बिले सादर करणाऱ्या एका मग्रुर कंत्राटदाराने थेट तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यालाच कार्यालयात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. इतकेच नाही तर ते दिव्यांग असल्याबद्दल अत्यंत हीन पातळीवर जाऊन त्यांचा अपमान केला आणि विधान परिषद निवडणुकीचे महत्वाचे शासकीय कागदपत्रे टेबलवरून उचलून फेकून फाडून टाकली.
सदर बझार पोलीस ठाणे – गु.र.नं. ९०५/२०२६
भा. न्या. सं. कलम १३२, ३०८(४), २२१, ३९८(४), ३३६(२), ३३५(३), ३४०(२), ३५१(२), ३५२, लोकप्रतिनिधी अधिनियम १३६(१)(ख) व दिव्यांग व्यक्ती अधिनियम कलम ९२(अ) प्रमाणे गंभीर गुन्हा दाखल.
फिर्यादी :- किरण दिंगबर जमदाडे, वय ५५ वर्षे, व्यवसाय – नोकरी (तहसीलदार), रा. मु. पो. वडाळा, ता. उत्तर सोलापूर
आरोपी :- राहुल शांतीकुमार गायकवाड, रा. ए ६४, अभिषेक नगर, मुरारजी पेठ, सोलापूर
धक्कादायक हकीकत अशी की –
आरोपी राहुल गायकवाड याने दि. २१/१०/२०२४ ते दि. २१/१०/२०२६ दरम्यान उपजिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे रोजगार हमी योजना, कंत्राटी तत्वावर तहसीलदार दक्षिण सोलापूर कार्यालयात काम केल्याबाबतची देयके मंजूर करून घेताना बनावट सह्या व कार्यालयाचे बनावट जावक क्रमांक टाकून ते खरे असल्याचे भासवून शासनाची फसवणूक केली आणि शासकीय रकमेचा अपहार केला. या प्रकरणी उपजिल्हाधिकारी (रो. ह. यो.) यांनी अहवाल सादर केल्यानंतर हे बिंग फुटले. तसेच सारथी विधानसभा निहाय २०२४ मध्ये याने पुरविलेल्या वाहनांची देयके नियमानुसार तपासून त्याचे मागणीपेक्षा जास्तीचे तब्बल १६ लाख रुपये मंजूर केले नाही.
याचाच राग मनात धरून दि. २१/१०/२०२५ रोजी दुपारी १५.०० वा. फिर्यादी व त्यांचे सहकारी हे महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक/पदवीधर मतदार संघ निवडणूक २०२६, पुणे विभाग, दक्षिण सोलापूरचे पूर्व तयारीचे काम करीत असताना आरोपी थेट तहसील कार्यालयात घुसला.
त्याने फिर्यादीजवळ येऊन “माझे बिलाचे काय केले” असा जाब विचारला. फिर्यादीने “तुझे बिल बरोबर काढले आहे, आता काही बिल शिल्लक नाही, माझे निवडणुकीचे काम करू दे” असे म्हणताच या माथेफिरूने टेबलवर ठेवलेले निवडणूक विषयक सर्व महत्वाचे शासकीय कागदपत्रे उचलून खाली फेकून दिले आणि “माझे बिल मंजूर केल्याशिवाय दुसरे कोणतेही काम करू देणार नाही, असे म्हणून शासकीय कामात अडथळा केला.
त्यावर फिर्यादीने “आता निवडणुकीचे काम चालू आहे, तुझे परत बघू” असे म्हणताच आरोपीने आपला खरा रंग दाखवला.
“माझ्या विधानसभेला पुरविलेल्या वाहनाचे बिल कमी का काढले, तुमच्यामुळे माझे १६ लाखाचे नुकसान झाले, मी मागणी केलेले पैसे तुम्हाला खिशातून द्यायचे नव्हते, शासनाचे पैसे द्यायचे होते, तुम्ही जाणून बुजून नियमांनुसार माझे बिल काढले, आता हे १६ लाख तुम्ही स्वतः मला द्यायचे, याकरिता तुम्हाला २ दिवसांची मुदत देतो, तुम्ही कोठे राहता, तुमच्या कुटुंबात कोण कोण असते हे देखील माहित आहे, तू एका पायाने लंगडा आहे, तुझा दुसरा पाय देखील काढायला कमी करणार नाही” असे म्हणून अरेरावीच्या भाषेत व मोठमोठ्याने बोलून धमकी दिली आणि फिर्यादी दिव्यांग असल्याबद्दल घृणास्पद आणि अपमानदर्शक शब्द वापरले.
इतक्यावरच न थांबता “मागणी प्रमाणे पैसे नाही दिल्यास खल्लास करीन व तुझ्या घरच्यांना देखील सोडणार नाही, आजच संध्याकाळी तुझ्या घरी येतो” असे म्हणून पैशाची मागणी करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
एका कर्तव्यदक्ष, दिव्यांग तहसीलदाराला त्याच्याच कार्यालयात घुसून मारहाण, अपंगत्वावरून शिवीगाळ आणि १६ लाखाची खंडणी मागणे हा प्रकार सोलापूरच्या प्रशासनाला काळिमा फासणारा आहे. निवडणुकीसारख्या अत्यंत महत्वाच्या राष्ट्रीय कामात अडथळा आणणाऱ्या आणि बनावट बिलाद्वारे शासनाला लुटणाऱ्या या गेंड्याच्या कातडीच्या कंत्राटदारावर कठोरात कठोर कारवाई करून त्याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी होत आहे.
तपास :- सपोनि-सावंत- हे करीत आहेत.



