सोलापुरात स्व. अजितदादा पवार यांचे भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारावे” – राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया व रयत क्रांती शेतकरी संघटनेचे महापौरांना निवेदन…

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी व त्यांच्या विकासात्मक कार्याला कायमस्वरूपी अभिवादन करण्याच्या उद्देशाने सोलापूर शहरात भव्य व प्रेरणादायी स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात महापौरांना सविस्तर निवेदन देण्यात आले.
सुरूवातीला महापौर विनायक कोंड्याल यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. तदनंतर ही निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे व रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, स्व. अजितदादा पवार यांनी आपल्या कारकिर्दीत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस व दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतले. विशेषतः जलसिंचन प्रकल्प, शेतकरी कर्जमाफी, पायाभूत सुविधा विकास, ग्रामीण भागातील रस्ते व वीजपुरवठा सुधारणा, औद्योगिक गुंतवणूक वाढविणे आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती या क्षेत्रात त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले. सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठीही त्यांनी वेळोवेळी निधी उपलब्ध करून देत विविध प्रकल्पांना गती दिली होती.
स्व. अजितदादांचे नेतृत्व, प्रशासनिक पकड आणि कार्यतत्परता यामुळे ते सर्वसामान्यांच्या मनात लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे राज्यासह सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली होती. आजही नागरिकांमध्ये त्यांच्या स्मृतींविषयी प्रचंड आदर व भावनिक जिव्हाळा आहे. हीच जनभावना लक्षात घेऊन सोलापूर शहरातील मध्यवर्ती व प्रतिष्ठित ठिकाणी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह सुशोभित स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
तसेच, स्मारक परिसरात त्यांच्या जीवनकार्याचे दस्तऐवजीकरण, छायाचित्र दालन, ग्रंथालय किंवा अभ्यासिका उभारण्यात यावी, जेणेकरून युवकांना त्यांच्या कार्याचा प्रेरणादायी वारसा समजेल, असा प्रस्तावही मांडण्यात आला. सोलापूर महानगरपालिकेने याबाबत ठराव मंजूर करून राज्य शासनाकडे तात्काळ प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “अजितदादा हे फक्त नेते नव्हते, तर विकासाची दिशा दाखवणारे नेतृत्व होते. त्यांचे स्मारक हे सोलापूरच्या विकास इतिहासातील एक अभिमानाचे प्रतीक ठरेल,” अशी भावना व्यक्त करण्यात आली.
महापौरांनी निवेदन स्वीकारून विषय गांभीर्याने विचारात घेतला जाईल व सकारात्मक पावले उचलली जातील, असे आश्वासन दिल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
या निवेदनावर महापौर विनायक कोंड्याल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या काळात निश्चितच स्व.अजित दादा पवार यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल असे आश्वासन यावेळी दिले .
यावेळी सुहास कोलारकर , रेवप्पा सुतार , पवन पाटील ,सागर रणदिवे , धनंजय शिंदे , विकास शिंदे , श्रीनिवास यादगिरी , संतोष माने , संदेश मुळावकर , सौरभ काटकर यांची उपस्थिती होती.



