सोलापूर बातमी

सोलापुरात हिंदू-मुस्लिम एकतेचा अनोखा उपक्रम : पोलिसांना गणेश मूर्ती आणि कुराण भेट….

सोलापूर :सोलापूर शहरात यंदा गणेश विसर्जन व जश्ने ईद-ए-मिलादुन्नबी हे दोन मोठे धार्मिक उत्सव शांततेत, आनंदात व एकात्मतेच्या वातावरणात पार पडले. दोन भिन्न धर्मांचे दोन मोठे सण एकाच काळात पार पडूनही कुठल्याही प्रकारचा जातीय तणाव निर्माण झाला नाही. यामागे सोलापूर पोलीस प्रशासनाचा सिंहाचा वाटा आहे, असे नागरिकांकडून एकमुखाने सांगण्यात येत आहे.

गणेशोत्सवात गणेश मूर्तींचे विसर्जन मोठ्या जल्लोषात करण्यात आले तर मुस्लिम बांधवांनी प्रेषितांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरा केला. या दोन्ही उत्सवाच्या काळात शहरात हजारो नागरिक सहभागी झाले होते. गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शहरात काटेकोर बंदोबस्त ठेवला. यामुळे कोणतीही अडचण, वाद किंवा अपघात घडला नाही.

डॉल्बी व डीजेमुक्त सण:
यंदा विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे संपूर्ण सोलापूर शहरात डॉल्बी व डीजेविरहित सण साजरे झाले. सामाजिक संघटनांनी “डॉल्बी मुक्त सोलापूर” असा आवाज उठवला होता. याला सकारात्मक प्रतिसाद देत पोलीस प्रशासनाने कोणत्याही मंडळांना डॉल्बी किंवा डीजे वाजविण्याची परवानगी दिली नाही. परिणामी उत्सव शिस्तबद्ध, प्रदूषणमुक्त व शांततेच्या वातावरणात साजरे झाले.

पोलिसांचा गौरव:
शहरातील विविध सामाजिक व धार्मिक संघटनांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त एम. राजकुमार व पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांची भेट घेतली. पोलिसांनी दिलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी आणि शांततेत सण साजरे होण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

या भेटीत शिष्टमंडळाने हिंदू धर्मातील गणेश मूर्ती आणि इस्लाम धर्मातील पवित्र कुराण या दोन भेटवस्तू पोलीस आयुक्त व उपायुक्तांना सन्मानपूर्वक अर्पण केल्या. हा उपक्रम सामाजिक ऐक्य, बंधुता आणि परस्पर आदराचे प्रतीक ठरला.

शिष्टमंडळातील मान्यवर:
या शिष्टमंडळात मराठा सेवा संघाचे दास शेळके, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे संस्थापक फारुक शेख, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. रियाज शेख, लोकप्रधान चे संपादक अयाज शेख, संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, ओम गर्जना मंडळाचे संस्थापक श्याम दूरी, अॅड. शिराज शेख, शिवसेना उपप्रमुख तुषार खंदारे, बाबा शेख, जहूर शेख आदी मान्यवर सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रसूल पठाण यांनी केले….

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel