सोलापूरच्या आयटी क्षेत्रात नवी सुरुवात…!
‘ॲपरिलाय टेक्नॉलॉजीज’च्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटरचे दिमाखात उद्घाटन...

सोलापूर शहराच्या आयटी क्षेत्रातील वाटचालीत एक सकारात्मक पाऊल पडले आहे. ‘ॲपरिलाय टेक्नॉलॉजीज’ या कंपनीच्या नवीन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटरचा उद्घाटन सोहळा होटगी रोडवरील इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये उत्साहात पार पडला. या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटरमुळे सोलापूरच्या स्थानिक तरुण तंत्रज्ञांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहे.
‘ॲपरिलाय टेक्नॉलॉजीज’ कंपनीच्या नवीन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटरमुळे सोलापूरची आयटी पार्कच्या दिशेने होत असलेली वाटचाल अधिक भक्कम झाली आहे. सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते आणि एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठाचे कुलगुरू गोपाळकृष्ण जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत या सेंटरचे उदघाटन करण्यात आले.
आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या साकेत मोकाटे आणि प्रसाद कंदलगावकर या दोन तरुण मित्रांनी एकत्र येऊन ॲपरिलाय टेक्नॉलॉजीज ही कंपनी २०१५ मधे सुरू केली आहे. आपल्या कौशल्याच्या जोरावर सोलापुरात उद्योजकता वाढवतानाच स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे संचालक साकेत मोकाटे आणि प्रसाद कंदलगावकर यांनी सांगितले.
या नवीन कंपनीमुळे सोलापुरातील तंत्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना आता शहरातच कामाच्या उत्तम संधी मिळणार आहेत, जी शहराच्या भविष्यातील विकासासाठी एक सकारात्मक बाब मानली जात आहे.
या सोहळ्याप्रसंगी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे, लक्ष्मी हायड्रोलिक कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे, सिंहगड कॉलेजचे प्राचार्य शंकर नवले, ज्ञानप्रबोधिनीचे संचालक अमोल गांगजी, पेठे फुड्सच्या संचालिका सुवर्ण पेठे, मीना मोकाटे, आशा कंदलगावकर, सच्चिदानंद व्हटकर, अविनाश गवळी, दर्शन रुईकर या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. या सर्वांनी तरुण संचालकांच्या धाडसाचे कौतुक करत कंपनीला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ॲपरिलाय टेक्नॉलॉजीज टीमचे सदस्य ओंकार व्हटकर, सोहन आगळे, प्रथमेश दुधनीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘ॲपरिलाय टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे पुण्यात बावधनला कार्यालय असून तिथे वीस तरुण तंत्रज्ञ कार्यरत आहेत. ‘ॲपरिलाय टेक्नॉलॉजीज’ कंपनीमुळे सोलापूरच्या औद्योगिक नकाशावर आयटी क्षेत्राचे स्थान अधिक ठळक झाले आहे.
—
आम्ही दहा वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहोत. आता सोलापुरात काम सुरू करत आहोत. वीस जणांची टीम आहे. पुढेही अनेकांना संधी मिळेल. आयटी क्षेत्रात सोलापूर खूप मोठे होईल. आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमध्ये काम करतो आणि ग्लोबल कंपनींना आमच्या सेवा देत आहोत. अनेक नव्या विषयांवर काम सुरू आहे. इच्छुक तरुण आम्हाला संपर्क करू शकतात.
– साकेत मोकाटे आणि प्रसाद कंदलगावकर (ॲपरिलाय टेक्नॉलॉजीज)
—
सोलापूरमध्ये आयटी पार्क सुरू होणार आहे, या पार्श्वभूमीवर ॲपरिलाय टेक्नॉलॉजीजची सुरुवात सकारात्मक आहे. आपल्या शहरांमध्ये आयटी क्षेत्राचा प्रगतीसाठी भरपूर वाव आहे. आयटी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रसाद आणि साकेत या दोघांची टीम वेगवेगळ्या देशांमध्ये सेवा देत आहे. या माध्यमातून येथील तरुणांना मोठ्या संधी मिळणार आहेत. साकेत आणि प्रसाद यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
– डॉ. सचिन ओंबासे,
आयुक्त, सोलापूर महापालिका



