सोलापूर न्यायालयाचा दणका ; वृध्द आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप व १० हजार रुपये दंडाची शिक्षा
सोलापूर (प्रतिनिधी): – सदर प्रकरणातील हकीकत अशी की, दि. १६/०३/२०२१ रोजी यातील फिर्यादी हा दुपारी ०२.३० वाजता त्याच्या वडीलासोबत कपडयाचा बाजार करुन घरी परतल्यावर जेवणखान करुन ऊसाचे पिकाला पाणी देण्यासाठी वस्तीचे जवळ गेला त्यावेळी त्याची पत्नी, मुलगी व मुलगा असे घरी होते. दुपारी ०३.०० वा. चे सुमारास त्याची पत्नी जनावराचा चारा कापुन त्याचे शेजारी राहणारा दशरथ महादेव शेळके याच्या घरासमोरुन जात असताना तिने फिर्यादीला मोठ्याने ओरडून “आपल्या मुलीस दशरथ हा काम करीत आहे, या पळा, लवकर या” असे सांगितले. फिर्यादी लगेच पळत दशरथ याच्या घरासमोर आला, त्यावेळी दशरथ हा वरचा शर्ट काढलेल्या अवस्थेत होता व फिर्यादीची मुलगी वय ३ वर्ष ६ महिने ही पलंगावर उघडया अवस्थेत झोपलेली दिसली, म्हणून फिर्यादीच्या पत्नीने आरोपी दशरथ यास तुला अक्कल आहे काय ? तु मुलीला काय करीत होतास असे म्हणून शिवीगाळ करीत असताना दशरथ हा तेथून बाहेर गेला. फिर्यादी व त्याच्या पत्नीने मुलीस तु येथे कशाला आलीस? अशी विचारपुस करीत असताना मुलीने हातावारे करून व तोंडाने अडखळत बोलून “बाबाने मला खावु देतो असे सांगून घरात बोलावले व पलंगावर बसवुन माझ्या अंगातील कपडे काढुन झोपवून त्याने माझेवर शारीरिक अत्याचार केला” असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने सदरचा प्रकार त्याच्या भावकीतील लोकांना सांगून फिर्याद दिली.
सदर प्रकरणाची सुनावणी श्रीमती संगिता शिंदे साो, जिल्हा व सत्र न्यायाधीश-३, सोलापूर यांचे न्यायालयात झाली. सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपुत यांनी काम पाहिले. जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग राजपूत यांनी आरोपीने फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा वैद्यकीय पुराव्याद्वारे तसेच फिर्यादी, फिर्यादीची पत्नी व त्याची अल्पवयीन मुलगी यांच्या साक्षीपुराव्याद्वारे अपराध सिध्द केला. तसेच आरोपीने केलेले कृत्य हे माणुसकीला काळीमा फासणारे आहे त्यामुळे आरोपीस जास्तीत जास्त कठोर शिक्षा करावी असा युक्तीवाद केला.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी, फिर्यादीची पत्नी, अल्पवयीन पिडीत मुलगी, वैद्यकीय अधिकारी, घटनास्थळ पंच, कपडे जप्ती व तपासी अमंलदार यांची साक्ष महत्वपुर्ण ठरली.
सदर आरोपीस मा. न्यायालयाने दोषी धरुन आरोपीस भा.द.वि. कलम ३७६, ३७६ (२), (जे), ३७६ (अब) तसेच बाललैंगिक अत्याचार कलम ४, ६, ८ व १० अन्वये दोषी धरुन आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप व र.रु. १०,००० दंडाची शिक्षा सुनावली, दंड न भरल्यास ६ महिने कैदेची शिक्षा सुनावली. याकामी आरोपीतर्फे अॅड. धनंजय माने यांनी काम पाहीले, तर कोर्ट पैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार जाधव यांनी काम पाहिले व प्रभारी अधिकारी ए.पी.आय. उदार यांनी सहकार्य केले.