सोलापूर क्राईमसोलापूर बातमी

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार तरूणास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा तर मदत करणाऱ्यास तीन वर्षे सशक्त कारावासाची शिक्षा

सोशल मिडीयावरून अल्पवयीन मुलीशी ओळख वाढवून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या तरूणास अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुरज केंद्रे यांनी मरेपर्यंत जन्मठेप आणि 17 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच पिडीतेला पळवून नेण्यासाठी मदत करणाऱ्यालादेखील न्यायालयाने तीन वर्षे सशक्त कारावास व 4 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
रोहित उर्फ रोहन मारूती बनसोडे (वय 24, रा. बापूजी नगर, जय भारत शाळा, स्लॉटर हाऊस झोपडपट्टी, अलकुंटे चौक, सोलापूर) असे मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. तर रोहित याचा साथीदार सुमित शशिकांत काटकर (वय 19, रा. राजस्व नगर, विजापूर रोड, सोलापूर) यासदेखील न्यायालयाने तीन वर्षे सशक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
यातील पिडीत अल्पवयीन मुलगी ही सन 2020 मध्ये कॉलेजमध्ये शिकत असताना एकाठिकाणी शिकवणीसाठी जात होती. त्यावेळी तिच्या एका मैत्रिणीने तिला मोबाईलवरील इंन्स्टाग्राम या सोशल मिडीया ॲपवर तिचे अकौंट काढून दिले. पिडीता ही इंन्स्टाग्राम ॲप वापरत असताना रोहित बनसोडे याने पिडीतेशी इंन्स्टाग्रामवर ओळख वाढवून तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर पिडीता व रोहित हे दोघे एका ठिकाणी भेटल्यानंतर रोहितने पिडीतेला त्याच्या आईला भेटायला जाऊ असे सांगून त्याच्या दुचाकीवरून हैद्राबाद रोडवरील एका लॉजवर नेले. त्याठिकाणी पिडीतेवर जबरदस्तीने शरीरसंबंध केले. त्यानंतर रोहित याने पिडीतेला तिचे व्हिडीओ शुटींग व फोटो काढल्याचे सागूंन ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. त्यानंतरही रोहित याने पिडीतेला वारंवार वेगवेगळ्या प्रकारे त्रास देऊन तिचा छळ करून तिच्याकडील पैसे, सोन्याचे दागिने घेऊन गेला. त्यानंतर 16 मे 2021 रोजी रोहित याने आपला मित्र सुमित काटकर याच्या मदतीने पिडीतेला दुचाकीवरून पळवून नेले होते. तसेच पिडीतेने दुचाकीवर बसण्यासाठी नकार दिल्याने तिला दोघांनी मारहाणही केली होती.
पिडीतेच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन विजापूर नाका पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिस निरीक्षक वाय एस गायकवाड यांनी तपास करून पिडीतेला शोधून काढून रोहित बनसोडे, सुमित काटकर यास अटक केली. पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये पिडीतेवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्यांमध्ये पोक्सो, बलात्काराचे कलम वाढविण्यात आले. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले.
या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश केंद्रे यांच्यासमोर झाली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे 15 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये आरोपीने पिडीतेवर फक्त शारीरीक अत्याचार केले नाही तर अनेकवेळा मारहाण करून तिला भावनिक ब्लॅकमेल केल्याचे सरकारी पक्षाने सिध्द केले. साक्षीदारांच्या साक्षी, पिडीतेची साक्ष, पुरावा आणि सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपी रोहित बनसोडे यास मरेपर्यंत जन्मठेप व सुमिक काटकर यास 3 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
याप्रकरणी सरकारतर्फे ॲड. शितल डोके यांनी तर आरोपीतर्फे ॲड. ईस्माईल शेख, ॲड. पी जी देशमुख यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून महिला पोलिस कर्मचारी घाडगे, आणि ए एम काळे यांनी मदत केली.
चौकट…
* रोहित बनसोडेला या कलमाखाली झाली शिक्षा…
– अल्पवयीन बालकास पळवून नेणे (आयपीसी 363) – 3 वर्ष, 1 हजार रुपये दंड
– वारंवार बलात्कार (आयपीसी 376(2) – मरेपर्यंत जन्मठेप, 10 हजार रुपये दंड.
– घरात घुसून मारहाण अत्याचार (आयपीसी 452) – 7 वर्ष, 1 हजार रुपये दंड.
– अपमान करून शांतता भंग (आयपीसी 504) – 2 वर्ष, 1 हजार रुपये दंड.
– गुन्हेगारी धमकी (आयपीसी 506) – 2 वर्ष, 1 हजार रुपये दंड.
– मारहाण (आयपीसी 323) – 1 वर्ष, 1 हजार रुपये दंड
– पोक्सो – 7 वर्ष, 1 हजार रुपये दंड.
– 11 आणि 12 – 3 वर्ष, 1 हजार रुपये दंड.
* सुमित काटकरला या कलमाखाली झाली शिक्षा…
– अल्पवयीन बालकास पळवून नेणे (आयपीसी 363) – 3 वर्ष, 1 हजार रुपये दंड.
– मारहाण (आयपीसी 323) – 1 वर्ष, 1 हजार रुपये दंड.
– अपमान करून शांतता भंग (आयपीसी 504) – 2 वर्ष, 1 हजार रुपये दंड.
– गुन्हेगारी धमकी (आयपीसी 506) – 2 वर्ष, 1 हजार रुपये दंड.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel