राजकीय

उद्धव ठाकरे- देवेंद्र फडणवीसांचा विधानभवनात सोबत प्रवेश, सत्तानाट्यानंतर पहिल्यांदाच झाला सामना

राज्यात झालेल्या मोठ्या सत्ता नाट्यानंतर पहिल्यांदाच ठाकरेसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमनेसामने आले आहेत. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी उद्धव ठाकरे येत असताना नेमकी देवेंद्र फडणवीस यांचीही एंट्री झाली. आणि काही झालेच नाही, अशा अविर्भावात दोघा नेत्यांनी संवाद साधला.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन नेते आज एकत्र विधानभवनात आले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. विधिमंडळ परिसरात दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले. त्यानंतर दोघेही नेते हसत हसत विधानभवनात गेले. त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे व भाजपचे काही आमदारही यावेळी उपस्थित होते.

मोठ्या कालावधीनंतर एकत्र

2019 च्या विधानसभा निकालानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी घरोबा करत सरकार स्थापन केले. त्यानंतर गेल्यावर्षी जूनमध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली. त्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. तेव्हापासून एकमेकांवर आगपाखड करणारे राज्यातील हे दोन महत्त्वाचे नेते आजपर्यंत समोरा-समोर आले नव्हते. मात्र बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर आज ते एकत्र दिसले.

शुक्रवारी अधिवेशचा शेवटचा दिवस

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस उरले आहेत. येत्या 25 मार्चला म्हणजेच शुक्रवारी अधिवेशचा शेवटचा दिवस असणार आहे. आज विरोधक आपला अंतिम आठवडा प्रस्तावदेखील विधानसभेत सादर करतील. तसेच, आजही शेतकऱ्यांचे प्रश्न, आनंदाचा शिधा या मुद्यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

सत्तानाट्यानंतर आज एकत्र

2019 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस समोरासमोर आलेले नव्हते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यापासून तर या उभयतांमधील वाद टोकाला गेल्याचे दिसून येत होते. संपूर्ण सत्तानाट्यानंतर आज दोघे नेते प्रथमच एकत्रित दिसले.

दोघांमध्ये चर्चा

आज विधीमंडळात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांची एकत्र एन्ट्री झाल्याने सगळ्यांच्या नजरा या दोन्ही नेत्यांकडे वळल्याचे पाहायला मिळाले. सभागृहात प्रवेश करेपर्यंत दोघेही एकमेकांशी चर्चा करत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोब आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. मात्र दोघांमध्ये नेमके काय बोलणे झाले हे समजू शकलेले नाही.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel