शुक्रवारी मढमधील अनधिकृत स्टुडिओची पाडापडी सुरू, ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचे स्मारक आज उद्धवस्त -किरीट सोमय्या
अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारी मढमधील अनधिकृत स्टुडिओची पाडापडी सुरू करण्यात आली. या ठिकाणी सकाळी अकराच्या सुमारास भाजप नेते किरीट सोमय्या यांनी भेट दिली. ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचे स्मारक आज उद्धवस्त झाले, अशी घणाघाती टीका त्यांनी यावेळी केली.
माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांच्या आशीर्वादाने या अनधिकृत स्टुडिओची उभारणी झाली होती. या बांधकामावर कारवाई करावी म्हणून आम्हाला दोन वर्षांचा संघर्ष करावा लागला, अशी माहिती सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. मढ येथील पाडापाडी सुरू असलेल्या स्टुडिओमध्ये रामसेतून, आदिपुरुष सारखा चित्रपटांचे शुटींग झाले आहे.
नेमके प्रकरण काय?
किरीट सोमय्या यांनी मालाड, मढ येथील ४९ बेकायदेशीर स्टुडिओ आणि २२ बेकायदेशीर बंगले पाडण्याची मागणी महापालिकेकडे केली होती. मात्र, त्यावर कारवाई झाली नाही. तत्कालीन सरकार, मंत्री आणि पालकमंत्र्यांनी या प्रकरणी कानाडोळा केला असा आरोप सोमय्यांचा होता. स्टुडिओ, बंगले उभारताना महापालिका, सरकारी प्राधिकरणाची परवानगी घेतली नाही. सीआरझेडचेही उल्लंघन केल्याचा आरोप आहे
ठाकरेंची माफियागिरी…
किरीट सोमय्या म्हणाले की, आदित्य ठाकरे आणि अस्मम शेख यांनी २०२१ मध्ये हे भ्रष्टाचाराचे स्मारक बांधले. टेम्पररी स्टुडिओ म्हणून शंभर फूट उंचीचे बांधकाम केले. उद्धव ठाकरे सरकारचे माफियागिरी आणि भ्रष्टाचारचे हे स्मारक आज उद्धवस्त करण्याची सुरुवात झाली आहे.
दोन वर्षांचा संघर्ष
किरीट सोमय्या पुढे म्हणाले की, मंत्री अस्लम शेख आणि मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आशीर्वादाने डझनभर स्टुडिओ बांधण्यात आले. पाच लाख स्क्वेअर फूट बांधकाम फेब्रुवारी २०२१ मध्ये केले. त्याला उद्धव ठाकरे सरकारने मान्यता दिली. या स्टुडिओवर कारवाई करायला दोन वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला. एक हजार कोटींचे स्टुडिओ तोडायला सुरुवात झाली आहे.
ट्विट करूनही माहिती…
मढ येथील स्टुडिओवरील कारवाईची माहिती किरीट सोमय्या यांनी ट्विट करून दिली. तसेच ते सकाळी अकराच्या सुमारास प्रतिकात्मक हातोडा घेऊन कारवाई स्थळी पोहचले. सोमय्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मढ मालाड येथील 1000 कोटीचे डझनभर अनधिकृत स्टुडीओ पाडण्याचे आदेश आज National Green Tribunal NGT ने दिला आहे, असलम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्या कृपेने 2021 मध्ये डझनभर अनधिकृत स्टुडीओ बांधण्यात आले. आम्ही न्यायालयात गेलो होतो.