टँकर व्यावसायिकाची गोळी झाडत हत्या…
मुंबई पश्चिम उपनगरातील कांदिवली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लालजी पाडा परिसरात गोळीबाराची घटना घडली. आज सकाळी 7 वाजून 57 मिनिटांनी ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एका 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान गोळीबाराचे नेमके कारण मात्र अद्याप समजलेले नाही. गोळीबार करुन आरोपी पसार झाला असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कांदिवली पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन पोलिसांनी तरुणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. गोळीबाराच्या घटनेमुळे कांदिवली लालजी पाडा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे कांदिवली लालजी पाडा परिसरात मागील सहा ते सात महिन्यांतील गोळीबाराची ही दुसरी घटना आहे. याआधी 1 ऑक्टोबर 2022 रोजी गोळीबाराची घटना घडली होती.
दरम्यान मृत तरुण या परिसरात टँकरने पाणी विक्रीचा व्यवसाय करत होता. याच व्यवसायाच्या वर्चस्व वादातून त्याची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कांदिवली पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
गोळीबाराची दुसरी घटना
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात कांदिवली पश्चिमेतील लालजी पाडा परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. परिसरात मध्यरात्री अचानक गोळीबार करण्यात आला. तब्बल चार राऊंड फायरिंग झाली होती. या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता तर अन्य तिघे जखमी झाले होते.
मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. बाईकवरुन आलेल्या दोघांनी अचानक गोळीबार करण्यास सुरुवात केली. परस्परांमध्ये असलेल्या वादातून गोळीबार करण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. यानंतर पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या दोन जणांना गुजरातमधून अटक केली होती.