महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे कोट्यवधींचे घबाड
नाशिक महापालिकेच्या लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांच्याकडे कोट्यवधींचे घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
निवृत्तीसाठी अवघा एक वर्षांचा कालावधी बाकी असताना सुनीता धनगर यांना 50 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बेड्या ठोकल्यात. त्यानंतर त्यांची घरझडती घेण्यात आली. तेव्हा त्यांच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती असल्याचे समोर येत आहे.
कोट्यवधींची मालमत्ता
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुनीता धनगर यांच्या घराची झडती घेतली. तेव्हा त्यांच्या घरात 85 लाख रुपयांची रोकड सापडली. सोबतच 32 तोळे सोने मिळाले. धनगर यांच्या नावावर नाशिकमधील उच्चभ्रू वस्तीत दोन प्लॅट आहेत. उंटवाडी परिसरात असलेल्या एका प्लॅटची किंमत दीड कोटी असल्याचे समजते. तसेच त्यांचा प्लॉटही असल्याचे समोर आले आहे. धनगर यांची बँक खाती, लॉकर्सचा तपास सुरू आहे. त्यातूनही मोठे घबाड सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
धनगर सध्या अटकेत
एका खासगी शैक्षणिक संस्थेतून बडतर्फ करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाला सेवेत न घेणाऱ्या संस्थेविरोधात कारवाई करण्यासाठी पत्र देण्याच्या मोबदल्यात धनगर यांनी हे पैसे स्वीकारलेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस सुनीता सुभाष धनगर व त्यांच्या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक नितीन अनिल जोशी यांच्याविरोधात लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पत्र देण्यासाठी लाच
तक्रारदार हे बाविस्कर नाशिकमधील एका खासगी शैक्षणिक संस्थेत मुख्याध्यापकपदावर कार्यरत होते. मात्र, त्याना संस्थेने गैरवर्तनाचा – उपका ठेवत मुख्याध्यापक पदावरून बडतर्फ केले होते. या बडतर्फीविरोधात मुख्याध्यापकाने शैक्षणिक न्यायाधीकरणाकडे दाद मागितली असता त्यांच्या बडतर्फीला स्थगिती देण्यात आली. दरम्यान, न्यायाधीकरणाच्या निकालानुसार मुख्याध्यापकाने संस्थेकडे सेवेत दाखल करून घेण्यासाठी पाठपुरावा केला असता त्यांनी टाळाटाळ केली. या संस्थेविरोधात कारवाई करण्यासाठी तक्रारदाराने शिक्षणाधिकान्यांकडे अर्ज केला असता त्यावर पत्र देण्यासाठी मुख्याधापकाकडे 50 हजारांची मागणी केली.
रंगेहाथ पकडले
लाच देण्याची इच्छा नसल्याने मुख्याध्यापकाने लाचलुचपत प्रतिबंधित विभागाकडे तक्रार केली. तेव्हा शुक्रवारी धनगर यांच्या कार्यालयातच सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून धनगर यांना 50 हजारांची रक्कम स्वीकारताच रंगेहाथ पकडण्यात आले. तर त्याचवेळी धनगर यांच्या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक नितीन जोशी याने हे पत्र बनवून देण्याच्या मोबदल्यात पाच हजारांची लाच घेतल्याने त्यालाही ताब्यात घेण्यात आले.
तो कर्मचारी खासगी
धक्कादायक बाब म्हणजे या कारवाईत पकडलेला लिपिक जोशी हा महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा कर्मचारीच नाही. तो नाशिकरोडच्या खासगी शैक्षणिक संस्थेतील कर्मचारी आहे. प्रतिनियुक्तीवर त्याची शिक्षणाधिकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात आली होती. ती नियुक्तीदेखील नियमानुसार आहे की नाही? हा मुद्दादेखील चर्चेत आहे.